Sanjay Nirupam on Maha Vikas Aghadi : सांगलीमध्ये पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या उपस्थित करण्यात आले. या कार्यक्रमाला शरद पवारही उपस्थित होते. पण, उद्धव ठाकरे नव्हते. यावर बोट ठेवत माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी टीका केली. विधानसभा निवडणुकीत तिन्ही पक्ष एकमेकांच्या जागा पाडण्यात कोणतीही कसर ठेवणार नाही, असे निरुपम म्हणाले.
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना माजी खासदार संजय निरुपम म्हणाले, "एक गोष्ट तर स्पष्ट झाली आहे की, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मिळून उद्धव ठाकरेंना सांगलीतून हद्दपार केले. लोकसभा निवडणुकीवेळी सांगलीमध्ये जे झाले, ते संपूर्ण देशाने बघितले आहे."
सांगलीत शिवसेनेचे डिपॉझिट जप्त झाले
"शिवसेनेकडे उमेदवार नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्याने, त्याचा वसंतदादा पाटलांच्या कुटुंबासोबत वाद आहे म्हणून त्यांनी त्यांचा एक उमेदवार उद्धव ठाकरेंकडे पाठवला. तुम्ही याच्या आधारावर जागेवर दावा करा आणि भांडा. का तर ही जागा काँग्रेसकडे जाऊ नये. शेवटी उद्धव ठाकरे-शरद पवारांनी असे षडयंत्र रचले की, सांगलीची जागा काँग्रेसला मिळाली नाही आणि काँग्रेसने आपला अपक्ष उमेदवार उभा केला. त्यानंतर उबाठा (शिवसेना) पराभूत झाली. डिपॉझिट जप्त झाले", असे म्हणत निरुपमांनी ठाकरेंना डिवचले.
"आज काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) दोन्ही सांगलीच्या कार्यक्रमात एकत्र आहेत. शिवसेना नाहीये. का, तर शिवसेना उबाठाला कमकुवत करण्याचे या दोन्ही पक्षांचे षडयंत्र आहे. आज सांगलीतून हद्दपार झाले आहेत. उद्या हे दोन्ही पक्ष उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातून हद्दपार करतील. कारण मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून जो वाद झाला, तो आपण सगळ्यांनी बघितला आहे", असे म्हणत निरुपम यांनी मविआला लक्ष्य केले.
ती मतभेद विकास आघाडी झालीये
"ते (उद्धव ठाकरे) भरसभेत म्हणाले की, नाव जाहीर करा. आणि शरद पवारांनी सांगितले की, जोपर्यंत निकाल येत नाही, तोपर्यंत निर्णय घेणे अवघड आहे. म्हणजे ज्याची जास्त संख्या, त्याचा मुख्यमंत्री असेल. याच्याकडे (उद्धव ठाकरे) इतकी संख्या असेल किंवा नाही, हे भविष्यात कळेल. पण, मतभेद विकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीने मतभेद सुरू आहेत, ते जागावाटपावेळी जास्त वाढतील. निवडणुकीच्या काळात दुसऱ्याच्या जागा पाडण्यात कोणतीही कसर सोडणार नाही, असे दिसत आहे", असे निरुपम म्हणाले.