लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्डी :शिर्डी जवळील साईपालखी निवारा येथील शिबीरस्थळी महात्मा गांधीच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रदेश कॉंग्रेसच्या नवसंकल्प शिबिराला सुरुवात करण्यात आली. यावेळी पादेशाध्यक्ष नाना पाटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण , महसूल मंत्री बाळसाहेब थोरात, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, उर्जामंत्री नितीन राऊत माणिकराव ठाकरे, यांच्यासह राज्यातील कॉंग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते. शिबीर सुरु होण्यापूर्वी सर्वच प्रमुख नेत्यांनी राज्यसभेबाबत कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट केले. राज्यसभेच्या जागेवरून नाराज असलेले अशिष देशमुख यांची मात्र, शिबिराला अनुपस्थिती आहे. शिर्डी,नगर- मनमाड महामार्ग व शिबीरस्थळ पूर्ण कॉंग्रेसमय झाले आहे.
मला नाही वाटत कुणाची नाराजी आहे
हायकमांड निर्णय घेत असतात. मला नाही वाटत कुणाची नाराजी आहे. ही तात्पुरती असते सगळे शांत होईल. हायकमांडचा निर्णय आहे. त्यास कुणी आवाहन देऊ शकत नाही, असे माजी केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.
बाकी काही नाही तुम्ही त्याला नाराजी म्हणतात
केंद्रीय नेतृत्वाला कामकाज चालविण्यासाठी आवश्यक वाटते ती माणसे घेतली जातात. अंतर्गत नाराजीचे चित्र फक्त मेडियात आहे प्रत्यक्षात नाही. फक्त मुकुल वासनिक यांना महाराष्ट्रातून उमदेवारी द्यावी एवढीच आमची मागणी होती. बाकी काही नाही तुम्ही त्याला नाराजी म्हणतात, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.
प्रतापगढी हे उत्तरप्रदेशातील महत्वाचे नेते
राज्यसभेसदंर्भात कोणतीही नाराजी नाही, प्रतापगढी हे उत्तरप्रदेशातील महत्वाचे नेते आहेत. देशभर पक्षाच्या प्रचार प्रसारासाठी त्यांचे महत्वपूर्ण योगदान असते. आपण जसे उत्तरप्रदेशच्या उमेदवारला मतदान करणार आहोत. तसेच मुकल वासनिक यांना राजस्थानात मतदान होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रला प्रतिनिधित्व मिळाले नाही असे म्हणता येणार नाही. आशिष देशमुख युवक नेतेत आहेत. त्यांचाशी बोलून त्यांची समजूत काढू, त्यांचे वडील मोठे नेतृत्व आहे, असे राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
हायकमांडचा निर्णय अंतिम असतो
मला वाटते या संदर्भात फक्त मीडियात नाराजी आहे. हायकमांडचा निर्णय अंतिम असतो. मतभेत असतात पण नाराजी नाही. थोडीफार असली तर आमचे आम्ही मिटवून घेऊ, अशीष देशमुख माझा भाऊ आहे,मित्र आहे, त्याच्याशी बोलू त्यांची नाराजी दूर करू त्यांच्या कुटुंबाचे पक्षासाठी मोठे योगदान आहे, असे महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.
राज्यसभेच्या संदर्भात कुठलीही नाराजी नाही राज्यसभेच्या संदर्भात कुठलीही नाराजी नाही. विरोधक व मीडिया यांनी चालविलेली मोहीम आहे. एखाद्याने मत मांडले तर नाराजी होऊ शकत नाही. कॉंग्रेस मध्ये लोकशाही आहे. मत मांडायचा प्रत्येकाला अधिकार आहे. भाजपासारखी आमच्याकडे हुकुमशाही नाही. त्यांच्यात मोठी खदखद आहे. पण दिसत नाही, असे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी नमूद केले.