रत्नागिरी : केंद्रातील व राज्यातील सध्याचे भाजपा सरकार जनहिताच्या विरोधात निर्णय घेत आहे. त्यामुळे जनतेत प्रक्षोभ आहे. त्यामुळे राज्यात अस्थितरता येऊ नये म्हणून धर्मनिरपेक्षता मानणारे पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकतात. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या तुटलेल्या आघाडीबाबत योग्य निर्णय होऊ शकतो, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत दिले. गेल्या पंधरा वर्षांत राज्यात व केंद्रातही काँग्रेस आघाडीची सत्ता होती. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत लोकांच्या मनात आघाडीबाबत नाराजी होती. नरेंद्र मोदींनी लोकांमध्ये आशा निर्माण केल्याने त्यांना यश मिळाले. मात्र, वर्षभरापूर्वीचा मोदींचा प्रभाव आता राहिलेला नाही. त्यामुळे पुन्हा धर्मनिरपेक्ष पक्षांचेच सरकार येणार, त्यासाठी कार्यकर्त्यांना तयारीचे आदेश दिले आहेत, असे तटकरे म्हणाले.राज्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठीच राज्यव्यापी दौरा येथून सुरू केला आहे. संघटनात्मक बदल, पुनर्रचना करावी लागणार आहे. पक्षाच्या वैचारिकतेवर ठाम असणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. कोकणच्या दौऱ्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा विभाग व गणेशोत्सवानंतर मराठवाडा विभागात दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून वादंग झाला आहे. याबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही भाष्य केले आहे. इतिहासातील आक्षेपार्ह लिखाणाला पवार यांचाही आक्षेप आहे. पवार जे बोलले ती पक्षाचीच भूमिका आहे. त्यांचा राजकीय अनुभव मोठा आहे. त्यामुळे आक्षेपार्ह लिखाण करून कोणी वाद निर्माण करावेत, हे योग्य नाही. खातरजमा होणे आवश्यकच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी पुन्हा शक्य
By admin | Published: August 19, 2015 12:57 AM