‘सन्मानजनक आघाडीसाठी काँग्रेस आग्रही; ५०-५० टक्क्यांचा फॉर्म्युला नाही’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 07:57 AM2018-08-29T07:57:45+5:302018-08-29T08:08:53+5:30
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी मंगळवारी केंद्रीय सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबाबत सकारात्मक सूर आळविला गेला.
मुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी मंगळवारी केंद्रीय सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबाबत सकारात्मक सूर आळविला गेला. मात्र, ही आघाडी सन्मानजनकच असायला हवी अशी भावनाही व्यक्त करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जागांबाबत ५०-५० टक्क्यांचा कोणताही फॉर्म्युला आलेला नाही, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. येत्या काळात सर्वच नेत्यांनी आपला अहंकार बाजूला ठेवत निवडणुका लढवायला हव्यात, समविचारी पक्षांनी एकत्र निवडणुका लढविताना वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यायला हवी. कर्नाटकमध्ये भाजपाला दूर ठेवण्यासाठी छोट्या पक्षाला संधी दिली. विचारधारेच्या लढाईसाठी काँग्रेसने हा त्याग केला आहे. असा त्याग करण्याची तयारी सर्वांनी ठेवायला हवी, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी बैठकीच्या समारोपाप्रसंगी सांगितले.
बैठकीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर, पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्व काँग्रेस नेते, प्रदेश पदाधिकारी आदी उपस्थित होते.
सरकारविरोधात राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेची घोषणा काँग्रेसने केली आहे. ३१ आॅगस्टला कोल्हापूरपासून यात्रा सुरू होईल. ती यशस्वी करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. केंद्र, राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला विविध मुद्द्यांवर घेरण्याची तयारी काँग्रेसने चालविली आहे. स्वत: पक्षाध्यक्ष राहुल गांधी सातत्याने भाजपाला लक्ष्य करतात. त्यामुळे जनसंघर्ष यात्रा आणि पुढील काळात पक्षाच्या केंद्रीय, प्रदेश स्तरावरून भाजपाला घेरण्याच्या रणनीतीवर, कोणी कोणता मुद्दा उचलावा आदींबाबत बैठकीत चर्चा झाली.
आमचा पंतप्रधान व्हावा - मल्लिकार्जुन खर्गे
निवडणुकीनंतर ज्यांच्या जागा अधिक, त्यांचा पंतप्रधान होईल, असे विधान शरद पवार यांनी केले असले तरी हा त्यांचा विचार आहे. काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून आमच्या जागा जास्त येऊन राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ही आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही मेहनत घेतोय. आगामी निवडणूक ही विचारधारेची लढाई आहे. नरेंद्र मोदी संघाची विचारधारा राबवित असून ही विचारधारा देशासाठी घातक आहे, असे खा. खर्गे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादीकडून फॉर्म्युला नाही
राष्ट्रवादीकडून आघाडीबाबत ५०-५० टक्केचा फॉर्म्युला दिल्याची दिवसभर चर्चा होती. मात्र असा प्रस्ताव आला नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वत: आपल्याला फोन करून याबाबतच्या बातम्या निराधार असल्याचे म्हटले आहे, असे खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले.