पश्चिम महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वीच ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 06:33 AM2019-08-27T06:33:49+5:302019-08-27T06:35:00+5:30

विधानसभा निवडणुकीचे पडघम : अनेक जण पक्षांतराच्या तयारीत; भाजप-शिवसेनेला आले ‘अच्छे दिन’!

Congress-NCP alliance is in trouble in western Maharashtra | पश्चिम महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वीच ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडी अडचणीत

पश्चिम महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वीच ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडी अडचणीत

Next

- वसंत भोसले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीच्या तुलनेने पश्चिम महाराष्ट्र या बालेकिल्ल्यात गत विधानसभा निवडणुकीत पिछाडीवर पडलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला निवडणूकीपूर्वीच खिंडार पडू लागल्याने आघाडीच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. त्या तुलनेने या परिस्थितीचा पुरेपूर लाभ भाजप उठवित असून, अनेकजण काँग्रेस आघाडीला सोडण्याचा निर्णय घेत आहेत.


सहकार चळवळीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रावर सतत वर्चस्व ठेवून असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गत निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने मोठा धक्का दिला. भाजपने ५८ पैकी एकवीस जागा जिंकल्या होत्या. पुणे जिल्ह्यातच या पक्षाला तेरा जागा मिळाल्या होत्या. त्यात पुणे शहराचा सिंहाचा वाटा होता. (आठपैकी आठ जागा जिंकल्या.) मात्र, सातारा या एकमेव जिल्ह्यातून भाजपला एकही जागा मिळाली नव्हती. सोलापूर आणि कोल्हापुरातून प्रत्येकी दोन, तर सांगलीतून चार जागा मिळाल्या. शिवसेनेने कोल्हापूर जिल्ह्यातून सहा जागांसह एकूण तेरा जागा पश्चिम महाराष्ट्रात जिंकल्या. या दोन्ही पक्षांच्या युतीकडे ३४ आमदार आहेत.


लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेकजण भाजपच्या वळचणीला जात आहेत. दररोज एका नेत्याचा प्रवेश चालू आहे. भाजप प्रत्येक मतदारसंघातून एका सक्षम उमेदवाराची चाचणी करीत आहे. शिवसेना पुन्हा सोडचिठ्ठी देऊन स्वतंत्र लढण्याची तयारी करीत आहे. पुणे वगळता इतर चार जिल्ह्यांत भाजपकडे विद्यमान आमदार आठच आहेत. या चार जिल्ह्यांत स्वतंत्रपणे लढण्यासाठी भाजपला ४५ उमेदवार लागणार आहेत. हीच अवस्था शिवसेनेची आहे. याउलट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार आहे. शिवाय त्यांच्याकडे अनेकांनी आघाडी सोडली तरी सक्षम उमेदवार आहेत.


पश्चिम महाराष्ट्रात केवळ आठ मतदारसंघांत काँग्रेस आघाडीकडे सक्षम उमेदवार नाहीत. याउलट भाजप-शिवसेनेवर लढण्यासाठी उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. त्यासाठी अनेकांचा प्रवेश चालू आहे. राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिवेंद्रराजे भोसले, श्यामल बागल, आदींनी पक्ष सोडला आहे. माजी खासदार धनंजय महाडिक, विद्यमान खासदार उदयनराजे भोसले हे सुद्धा पक्ष सोडण्याच्या मार्गावर आहेत, अशी चर्चा आहे.


काँग्रेसमधून माजी मंत्री भरमू अण्णा पाटील, माजी आमदार दिलीप माने, सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी आमदार मदन भोसले आदींनी पक्षांतर केले आहे. काँग्रेसची अवस्था आणखीन केविलवाणी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गत निवडणुकीत स्वतंत्र लढवूनही सर्व जिल्ह्यात यश मिळविले आणि सोळा जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला केवळ सातच जागा मिळाल्या. त्यात पुण्यात एकच जागा मिळाली. (भोरचे संग्राम थोपटे, सांगली जिल्ह्यात डॉ. पतंगराव कदम यांचा एकमेव विजय होता.) कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता.


भाजप-शिवसेनेची युती झाली न झाली तरी संधीची वाट पाहत अनेकजण पक्षांतर करीत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत संघर्षातून, तसेच आघाडी झाल्यास संधी मिळणार नाही, अशी गणिते घालून अनेकजण पक्षांतर करीत आहेत. याउलट भाजपची गरजही मोठी आहे. स्वतंत्र लढायचे झाले तर भाजपकडे पुणे जिल्हा वगळता इतर चारही जिल्ह्यांतील सर्व जागा लढविण्यासाठी स्वपक्षाचे उमेदवारही नाहीत. घाऊक पद्धतीने उमेदवार आयातीचा कार्यक्रम चालू आहे.

गणपतराव घेणार निवृत्ती!
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरच्या १९६२ मधील पहिल्या निवडणुकीपासून लढत देणारे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख ऊर्फ आबा पुढील सभागृहात असणार नाहीत. त्यांनी वृद्धापकाळामुळे आता निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
१९६२ ते २०१४ पर्यंतच्या सर्व एका पोटनिवडणुकीसह तेरा निवडणुका लढविल्या. त्यापैकी १९७२ ला ते पराभूत झाले. मात्र, एका वर्षातच आमदारांचे निधन झाले आणि पोटनिवडणुकीत देशमुख निवडून आले. १९९५ मध्ये त्यांचा थोडक्या मताने पराभव झाला. या एकमेव सभागृहात ते नव्हते. अन्यथा, गेल्या बारा सभागृहांचे ते सदस्य होते.

Web Title: Congress-NCP alliance is in trouble in western Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.