तीन पक्षांनी ठरवून केला भाजपावर नियाेजनबद्ध हल्ला; शिवसेना चार्ज, ठरवून वातावरण तापविले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 11:24 AM2022-02-17T11:24:53+5:302022-02-17T11:25:38+5:30

गेले काही दिवस ज्या पद्धतीने भाजपकडून शिवसेनेच्या नेत्यांना लक्ष्य केले जात होते, त्यावरून शिवसेना नेत्यांमध्ये खदखद होती.

Congress, NCP and Shivsena parties decide to launch systematic attack on BJP; Shiv Sena Aggresive | तीन पक्षांनी ठरवून केला भाजपावर नियाेजनबद्ध हल्ला; शिवसेना चार्ज, ठरवून वातावरण तापविले

तीन पक्षांनी ठरवून केला भाजपावर नियाेजनबद्ध हल्ला; शिवसेना चार्ज, ठरवून वातावरण तापविले

Next

अतुल कुलकर्णी

मुंबई :  शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडलेल्या मुद्द्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीने दिलेली साथ हा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरवून केलेला कार्यक्रम होता. त्यासाठीची मोर्चेबांधणी गेल्या काही दिवसांपासून पडद्याआड सुरू होती. शिवसेना भवनावर पत्रकार परिषदेच्या झालेल्या इव्हेंटमुळे शिवसेना चार्ज झाली हा थेट लाभ असला तरी महाविकास आघाडीचे नेतेही यामुळे एकत्र आले आहेत. त्याचाच भाग म्हणून आज, गुरुवारी ‘वर्षा’वर काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडत आहे.

राऊत यांच्या पत्रकार परिषदेला खासदार, आमदारांना वातावरण तयार करण्यासाठी बोलावून घेतले गेले. त्याआधी राज्यातल्या महत्त्वाच्या शहरांत आदित्य ठाकरे यांनी दौरे करून राजकीय पार्श्वभूमी समजून घेण्याचाही प्रयत्न केला होताच. दुसरीकडे आपल्या आक्रमक कामाने पक्षाला चार्ज करण्यात आदित्य यांनी भूमिका बजावणे सुरू केले होते. याच कालावधीत खा. संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतींना पत्र दिले होते. त्याला तसा काहीच अर्थ नव्हता. त्यांना त्या पत्राची दखल घेतली जावी असे वाटले असते तर त्यांनी ते राष्ट्रपतींना दिले असते. मात्र, त्यांना हळूहळू राजकीय वातावरण तापवायचे होेते. त्यासाठी त्या पत्राचा उपयोग झाला असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

या दरम्यान, लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी काँग्रेसवर कठोर टीका केली. त्यावर राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेत भाषण केले. दुसरीकडे महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर हल्ला चढविणे सुरू केले होते. त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला; पण तो फसला होता. तोपर्यंत शिवसेनेने पुढाकार घेऊन काय बोलायचे आणि किती बोलायचे हे ठरले होते. त्यानुसारच खा. राऊत यांनी मोघम आरोप केले. कोणतेही पुरावे त्यांनी दिले नाहीत. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली नाहीत. त्यामुळेच जी नावे समोर आली त्यावरून भाजप नेत्यांनी मूळ विषय सोडून प्रतिक्रिया देणे सुरू केले. 

गेले काही दिवस ज्या पद्धतीने भाजपकडून शिवसेनेच्या नेत्यांना लक्ष्य केले जात होते, त्यावरून शिवसेना नेत्यांमध्ये खदखद होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काहीच भूमिका घेत नाहीत. आता डोक्यावरून पाणी जात आहे. किती दिवस हे असेच चालू द्यायचे. या सगळ्याला जशास तसे उत्तर दिले नाही तर आपल्याला येणाऱ्या महापालिका निवडणुकीत तोंड दाखविणे कठीण होईल, असा सूर जोर धरत होता. त्याच दरम्यान भाजपने दिल्लीत काँग्रेसवर केलेल्या हल्ल्यामुळे काँग्रेस नेतेही अस्वस्थ होते. हा सगळा घटनाक्रम आणि पार्श्वभूमी लक्षात घेतली की शिवसेनेच्या कालच्या पत्रकार परिषदेचे अनेक पदर उलगडतील. किरीट सोमय्या यांच्या बोलण्यामुळे अनेकदा आमची अडचण होते; पण त्यांना सांगणार कोण? अशा राज्यातील भाजप नेत्यांची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी ठरावी.

जी काही नावे घेतली तीदेखील जाणीवपूर्वक घेतली. त्यातून ज्यांना जे समजायचे ते बरोबर समजेल अशी व्यवस्था केली गेली. हे सगळे ठरवून केले गेले. येत्या काळात तुमच्याकडून होणारे हल्ले थांबले नाहीत तर भविष्यात या नावांचा कोणाशी, कसा संबंध आहे हे उघड करायचे असा राजकीय डावपेचही या सगळ्यांच्या मागे आखला गेला आहे. 

Web Title: Congress, NCP and Shivsena parties decide to launch systematic attack on BJP; Shiv Sena Aggresive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.