ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 17 - आयुष्यभर जमा केलेली पुंजी सुरक्षीत ठेवण्यासाठी आपण चांगली बँक निवडतो. चांगला परतावा देणारी, सुरक्षीत बँक आपल्याला हवी असते. असाच प्रकार हा मतदानाचा आहे. ज्या मतामुळे तुमच्या शहराचा विकास होईल, तुम्ही व्यक्त केलेल्या अपेक्षांची पुर्ती होईल, अशाच बँकेत आपल्या मतांचे ‘डिपॉझिट’ आपण केले पाहिजे. सध्याच्या निवडणुकीत मतांचे ‘डिपॉझिट’ मागण्यासाठी आलेल्या पक्षांमध्ये शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस तर राहुल गांधी यांचा काँग्रेस या दोन्ही बँका कितीही चकचकीत दिसत असल्या तरी त्या दिवाळखोरीत निघालेल्या आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केली.
अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिष पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, महापौर उज्ज्वला देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी शरद पवार, अजित पवार व राहुल गांधी यांचे पक्ष दिवाळखोरीत निघाल्याचे सांगतानाच भाजपा हा एक सक्षम पर्याय असल्याचे स्पष्ट केले. या बँका परतावा तर देत नाहीच; मात्र मुद्दलही फस्त करतात, असा टोलाही त्यांनी लगावला. मतदान रुपी डिपॉझिट भाजपला दिले तर पाच वर्षांत पाच पट विकासाचे व्याज देऊन मुद्दलही परत करण्याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली. भाजपा सरकारने दमदार कामगिरी करीत शहराच्या विकासाचा आलेख उंचावला असल्याचे ते म्हणाले.
आता पाय मोकळा करून घेतला...
शिवसेनेसोबत युती तुटल्याचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी सूचक भाष्य केले. शिवसेनेचा उल्लेख टाळत मुख्यमंत्री म्हणाले, की भाजपा स्वतंत्रपणे निवडणुक रिंगणात आहे. विकासाचा मुद्दा घेऊन आपण लोकांमध्ये जात आहोत. त्यामुळे या निवडणुकी स्वबळावर सत्ता मिळेल यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे. आता पाय मोकळा करून घेतला आहे. तो पुन्हा अडकविण्याची वेळ येणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही मला मनपा द्या, मी तुम्हाला विकास, परिवर्तनाचा शब्द देतो, असे आवाहन त्यांनी केले.
विदर्भातील मनपांना जादा निधी...
विदर्भातील महापालिकांपैकी नागपूरमध्ये विकासाची घोडदौड सुरु आहे. परंतु, अकोला, अमरावती व चंद्रपूर या महापालिकांना अजुनही विकासाची आस आहे. या विदर्भाचा भूमीपूत्र आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. आतापर्यंत राज्याच्या एकाच भागाला निधी जात होता. आता तो अन्याय दूर करीत आहोत. राज्याच्या सर्वच भागांचा विकास झाला पाहिजे, यासाठी आपण कटीबद्ध आहोतच; परंतु आतापर्यंत ज्या भागाला विकास निधी देताना हात आखडता घेतल्या गेला, तेथे विकासाचा अधिक निधी जात असेल, तर कोणाच्या पोटात दुखता कामा नये, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.