हरीश गुप्तानवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना केलेल्या एका फोनने दुरावा दूर झाला आणि हे पक्ष पुन्हा भाई-भाई म्हणून एका व्यासपीठावर आले. प्रजासत्ताक दिनी मुंबईत झालेल्या ‘संविधान बचाव रॅली’च्या निमित्ताने भाजपाच्या विरोधात विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात शरद पावर यांनी घेतलेल्या पुढाकारास यश आले.काँग्रेस पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, शरद पवार यांनी स्वत: राहुल गांधी यांना फोन केल्याने दोन्ही पक्षांमधील दुरावा दूर झाला. देश आणि राज्यघटना वाचविण्यासाठी भाजपाच्या विरोधातएकत्र येण्याची गरज पवार यांनी राहुल गांधींना पटवून दिल्यावर या रॅलीच्या निमित्ताने दोन्ही काँग्रेस इतर विरोधी पक्षांसोबत एका व्यासपीठावर येण्याचा मार्ग मोकळा झाला. पवार यांनी राहुल गांधी यांना फोन केला तेव्हा तेथे हजर असलेल्या काँग्रेसच्या एका वरिष्ठ पदाधिकाºयाने सांगितले की, पवार यांनी असा पुढाकार घेणे विरळाच म्हणावे लागेल.भंडारा-गोंदियाचा तिढानव्याने होत असलेल्या जवळिकीने या दोन पक्षांमधील सर्व प्रश्न सुटतील असे नाही, असे सांगून या सूत्रांनी भंडारा-गोंदिया मतदारसंघात होणाºया लोकसभा पोटनिवडणुकीचा संदर्भ दिला. तेथून निवडून आलेले भाजपा खासदार नाना पटोले काँग्रेसमध्ये गेले आहेत. सन २०१४ मध्ये आघाडी मोडण्याआधी ही जागा राष्ट्रवादीकडे होती. पटोले पुन्हा तेथून पोटनिवडणूक लढविण्याची शक्यता नाही. त्यामुळे दोन्ही काँग्रेस एकत्र आल्यास ही जागा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्यात जाऊ शकेल.पवार यांचे म्हणणे पटल्यावर राहुल गांधी यांनी लगेच सांप्रदायिक शक्तींना रोखण्यासाठी आपला पक्ष नेहमीच पाठिंबा देईल, असे सांगून टाकले. एवढेच नव्हे तर ‘संविधान बचाव रॅली’मध्ये एकदिलाने सहभागी होण्याचे निर्देशही महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना दिले.यानुसार सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण व सध्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असलेले अशोक चव्हाण असे राज्याचे तिन्ही माजी काँग्रेस मुख्यमंत्री या रॅलीमध्ये सहभागी झाले.या वृत्ताला दुजोरा देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, या रॅलीच्या निमित्ताने सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे पवार यांचे प्रयत्न होते व त्याच संदर्भात त्यांनी राहुल गांधींनाही फोन केला.संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारच्या विरोधात विरोधकांची एकत्रित रणनीती ठरविण्यात राहुल गांधी जो काही पुढाकार घेतील त्यास साथ देण्याचे पवार यांनी ठरविले असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
भाजपाच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र, दुरावा झाला कमी, शरद पवारांचा राहुल गांधींना फोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 6:17 AM