काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधाचा सूर सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 05:10 AM2018-10-31T05:10:49+5:302018-10-31T05:12:13+5:30
राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारला चार वर्ष पूर्ण होत असताना काँग्रेस, राष्ट्रवादीला सरकार विरोधी सूर सापडला आहे.
- अतुल कुलकर्णी
मुंबई : राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारला चार वर्ष पूर्ण होत असताना काँग्रेस, राष्ट्रवादीला सरकार विरोधी सूर सापडला आहे. काँग्रेसने संघर्ष यात्रा काढून राज्यभर विरोधी वातावरण तयार करण्यास सुरुवात केली तर राष्ट्रवादीने हल्लाबोल यात्रा काढून सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला आहे.
विरोधी पक्ष आहे कुठे आहे, असा प्रश्न गेली चार वर्ष विचारला जात होता. तर दुसरीकडे सत्तेत सहभागी असून देखील शिवसेना नेते विरोधकांची भूमिका बजावत होते. मात्र जशा निवडणुका जवळ येऊ लागल्या तसे दोन्ही काँग्रेसने आपापसातील मतभेद विसरुन एकत्र येण्याची भूमिका घेतली आहे. राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर आमचे लोकसभेच्या ४२ जागांवर एकमत झाले आहे, असेही जाहीर करुन टाकले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सतत पाण्यात पाहणारे राष्टÑवादीचे नेते आता त्यांच्या शेजारी बसून राज्यातील विरोधी पक्षाची रणनिती ठरवू लागले आहेत. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो असे सांगून अजित पवार यांनी त्या वादावर पडदा टाकला.
राष्टÑवादी काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारलेल्या ५६ प्रश्नांचे किंवा काँग्रेसने तूरदाळीवरुन उपस्थित केलेल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर भाजपाने दिले नाही. विरोधकांच्या एकीमुळे शिवसेनेला जवळ करण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रोज सरकारवर टिकेची झोड उठवत असताना भाजपामधील एकही नेता शिवसेनेविरुद्ध ब्र काढायला तयार नाही. यातूनच भाजपाची अगतिकता दिसून येते.
चव्हाणांचा पुढाकार
विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी सरकारबाबत नरमाईची भूमिका घेतल्याची टीका झाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून खा. अशोक चव्हाण यांनी राज्यात सरकार विरोधी वातावरण तयार करण्यात आघाडी घेतली. सरकारविरोधी वातावरण होऊ शकते असे दिसू लागताच विरोधक आक्रमक झाल्याचे दिसते.