मुंबई - देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र सरकार आल्यापासून भाजपमध्ये मोठ्याप्रमाणात इतर पक्षातील नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची इन्कमिंग वाढली आहे. राज्यात इतर पक्षातील नाराज नेत्यांना भाजपमध्ये घेण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धडाकाच लावला आहे. तर, राष्ट्रवादी- काँग्रेसच्या लोकांची माझ्या बंगल्यासमोर भाजपमध्ये येण्यासाठी रांग लागलेली असते, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले. जळगाव येथे ब्राम्हण सभेच्या सभागृहात पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरु आहेत. एखाद्या पक्षाचा नेता नाराज असल्याची बातमी माध्यमातून आली की, भाजपची एक टीम त्या नेत्याच्या संपर्कात राहते आणि थेट मुख्यमंत्री यांच्या भेटीचं निमंत्रण मिळते. आता तर मात्र भाजपमध्ये प्रवेशासाठी चक्क रांगा लागत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये नेते राहायला तयार नाहीत. भाजपमध्ये येण्यासाठी माझ्या मुंबईच्या बंगल्यावर रोज सकाळपासून लाईन लागलेली असते. शेवटी हात जोडून नंतर पाहू असे सांगावे लागते. अशी परिस्थिती आहे, असे महाजन म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत मुलाला उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी औरंगाबादमधील सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सुद्धा लोकसभेला काँग्रेसेने उमेदवारी न दिल्याने पक्ष सोडले. त्यांनतर ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरु होती. दुसरीकडे, काँग्रेस-राष्ट्रवादीचे मिळून २५ हून अधिक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्यासाठी संपर्क केला असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी पक्षप्रवेश केले तर नवल वाटू नयेत.