एनपीआरची तयारी झाली, आता निर्णय काँग्रेस राष्ट्रवादीने घ्यावा- आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 09:57 PM2020-02-07T21:57:40+5:302020-02-07T22:14:59+5:30
काँग्रेस, राष्ट्रवादीनं राज्याची भूमिका स्पष्ट करावी- आंबेडकर
मुंबई: राज्यात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) राबवण्याची तयारी झाली असून याबाबत राज्याची भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी, जेणे करून राज्यातील जनतेला दिलासा मिळेल की त्यांनी नेमके काय करावे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. एनपीआरबाबत जनता गोंधळलेल्या अवस्थेत असून आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे असेदेखील त्यांनी पुढे म्हटले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष डॉ. अरुण सावंत उपस्थित होते.
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) च्या कार्यक्रमाची सुरुवात 1 एप्रिल पासून होणार आहे. नागरिकत्व काढून घेण्याची ही पहिली पायरी आहे. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीने विशेष अधिवेशन बोलावून त्यात एक ठराव मंजूर करावा. शिवाय त्यात सरकारी अधिकारी, कर्मचारी सहभाग घेणार नाही, असा ठराव मंजूर करावा, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत असल्याचे ही प्रकाश आंबेडकर म्हणाले.