'शिवसेनेला घातली ईडीची भीती, त्यामुळेच झाली भाजपासोबत युती'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 07:39 PM2019-02-18T19:39:20+5:302019-02-18T19:42:02+5:30
शिवसेना-भाजपावर काँग्रेस, राष्ट्रवादीची जोरदार टीका
मुंबई: शिवसेना-भाजपाची युती जवळपास निश्चित झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपानं एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मात्र याबद्दलची अधिकृत घोषणा होण्याआधीच काँग्रेस, राष्ट्रवादीनं युतीवर तोफ डागली. अंमलबजावणी संचलनालयाच्या भीती भाजपाकडून दाखवण्यात आल्यानं शिवसेनेनं युती केल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपावर कायम टीकेचे बाण सोडणारी शिवसेना युतीसाठी कशी काय तयार झाली, याचं उत्तर त्यांनी राज्यातल्या जनतेला द्यायला हवं, असं विखे पाटील यांनी म्हटलं. 'माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार, भाजपाकडून शिवसेनेला ईडीची भीती दाखवण्यात आली. त्यानंतर त्यांनी लगेच युतीची तयारी दर्शवली,' असा दावा त्यांनी केला. काँग्रेससोबतच राष्ट्रवादीनंही युतीवर निशाणा साधला. 'चौकीदार ही चोर अशी टीका शिवसेना पंतप्रधानांवर करत होती. मघ आता हे चोरावर मोर आहेत का,' असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उपस्थित केला.
शिवसेना-भाजपाच्या युतीची घोषणा थोड्याच वेळात होण्याची शक्यता आहे. या चर्चेसाठी भाजपा अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर मुंबईत आले आहेत. या नेत्यांसह शहांनी सोफिटेल हॉटेलमध्ये चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित होते. त्यानंतर ही नेते मंडळी युतीच्या चर्चेसाठी मातोश्रीवर पोहोचली. याआधी उद्धव यांनी मातोश्रीवर शिवसेनेच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला संजय राऊत, चंद्रकांत खैरे, मनोहर जोशी, एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. युती झाल्यानंतर नेमकी रणनिती काय असणार, जनतेसमोर कोणते मुद्दे घेऊन जाणार, याबद्दल या दोन्ही बैठकांमध्ये चर्चा झाल्याचं समजतं. गेल्या पाच वर्षांमध्ये शिवसेनेनं सातत्यानं मोदी सरकारवर टीका केली आहे. याशिवाय स्वबळाचा नारादेखील उद्धव यांनी दिला होता, त्यामुळे आता शिवसेना मतदारांना कशी सामोरी जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.