ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - देवनार डम्पिंग ग्राउंडवर गेल्या आठवड्यात लागलेल्या आगीचे प्रकरण सरकारने नीट न हाताळल्याचा आरोप करत काँग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांनी बुधवारी अर्थसंकल्पादरम्यान निषेध नोंदवला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते पोल्युशन मास्क उपस्थित होते, तर काँग्रेसच्या नगरसेवकांनी स्थायी समितीच्या सदस्यांना घेराव घालून घोषणाबाजी केली.
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला गेल्या आठवड्यात गुरुवारी लागलेली आग चार दिवसांनंतरही पूर्णपणे नियंत्रणात आली नव्हती. तब्बल ९६ तासांनंतरही उलटून गेल्यानंतरही रविवार संध्याकाळपर्यंत ही आग पूर्ण विझली नव्हती. या आगीच्या धुराच्या लोटांमुळे व वातावरणातील प्रदूषणाने स्थानिक कमालीचे त्रस्त झाले. या सर्व प्रकाराचा आज काँग्रेस - राष्ट्रवादीने निषेध नोंदवला.
आगीमागे अल्पवयीन मुलांचा हात..
देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील संशयास्पद आगीमागे अल्पवयीन मुलांचा हात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात १० ते १२ वर्षांच्या तीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाची धडपड सुरू असताना १० ते १२ वर्षांची तीन लहान मुले आग लागलेली नाही, अशा भागात आग लावत असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांचा माग घेईपर्यंत तिघेही पसार झाले होते. या प्रकरणी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.