काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी १०६ जागा लढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 05:04 AM2019-08-30T05:04:17+5:302019-08-30T05:05:26+5:30
काही जागांचा तिढा : उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडणार
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जागा वाटप अंतिम टप्प्यात असून सध्या प्रत्येकी १०६-१०६ जागा निश्चित झाल्या आहेत. काही जागांबाबत बाद आहे. काँग्रेसची पहिली यादी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक समितीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी दिल्लीतपार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, आमदार के. सी. पाडवी, छाननी समितीचे सदस्य हरीश चौधरी व मणिकाम टागोर उपस्थित होते.
येत्या आॅक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी निश्चित आहे. यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सध्या १०६-१०६ जागा निश्चित केल्या आहेत.
उर्वरित जागा मित्रपक्षांना देण्याची तयारी दर्शविली आहे. यात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वातील स्वाभिमान शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, शेकाप व रिपब्लिकन पक्षाचे कवाडे गट व गवई गट हे प्रमुख पक्ष आहेत. यावेळी मनसेला आघाडीत स्थान द्यावे काय? याबद्दल काहीही चर्चा झालेली नसल्याचे समजते.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही जागांवर अद्यापही तिढा कायम असल्याची कबुली या काँग्रेस नेत्याने दिली. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. या जागा सध्या काँग्रेसकडे असून काँग्रेसनेही दावा केला आहे. हा वाद आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चर्चेनंतर सुटणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काँग्रेसची यादी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. उमेदवारांना प्रचाराची संधी मिळावी, यासाठी पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घोषित होण्याची शक्यता असल्याचे छाननी समितीच्या एका सदस्याने सांगितले.