- अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास २०० जागांवर एकमत झाले आहे. पुढील चर्चा करण्यासाठी येत्या १६ जुलै रोजी मुंबईत दोन्ही पक्षनेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, नसीम खान, तर राष्ट्रवादीकडून विधिमंडळ नेते अजित पवार, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची उपस्थिती असेल.
यासंदर्भात लोकमतशी बोलताना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, बुधवारी आम्ही आमच्या नेत्यांची एक बैठक घेतली. त्यात विधानसभा मतदारसंघनिहाय चर्चा झाली. आमच्या े विद्यमान जागा व ज्या ठिकाणी आम्ही पराभूत झालो होतो पण आता जेथे आमची परिस्थिती चांगली आहे अशा आमच्या जवळपास १०० जागा आहेत.
तेवढ्याच जागा राष्ट्रवादीच्याही अंतिम होत आल्या आहेत. त्यामुळे उर्वरित ८८ जागांसाठी मित्रपक्षांशी काय बोलणी करायची यावरही १६ तारखेला चर्चा होईल, असेही चव्हाण म्हणाले. आमच्या मुलाखती घेण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे, पण आत्ताच काही बोलणे योग्य नाही, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. बहुजन वंचित आघाडी सोबत काही बोलणी झाली का? असे विचारले असता चव्हाण म्हणाले, त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद नाही. ज्येष्ठ विचारवंत लक्ष्मण माने यांनी वंचित आघाडीला रामराम ठोकला आहे. त्यांच्यातच एकवाक्यता दिसत नाही पण आमची चर्चेची पूर्ण तयारी आहे. प्रदेशाध्यक्षपदाचा आपण राजीनामा दिला आहे, शिवाय आपल्याऐवजी दुसऱ्या कोणावर जबाबदारी द्या असेही आपण श्रेष्ठींना सांगितले आहे हे खरे आहे का? असे विचारले असता चव्हाण म्हणाले, मी श्रेष्ठींना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अन्य कोणाकडे द्या असे आग्रहपूर्वक सांगितले आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मी काम चालूच ठेवले आहे.
कर्नाटकमुळे प्रदेशाध्यक्षाची निवड रखडलीपक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे सरचिटणीस वेणूगोपाल हे दोन्ही नेते कर्नाटकात निर्माण झालेल्या पेचप्रसंगामुळे तिथे अडकले आहेत. त्यामुळे राज्यातल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय रखडल्याचे सुत्रांनी सांगितले. अशोक चव्हाण यांच्या नकारानंतर बाळासाहेब थोरात यांनी हे पद स्वीकारण्यास उशिर होत असल्याचे मत व्यक्त केल्याचे समजते. तर हर्षवर्धन पाटील यांनी पद स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे.