ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 29 - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली असून, औसा विधानसभा मतदारसंघातील गट व गणातील जागांची बोलणी सुरू आहे. उर्वरित ४ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला जि़पच्या १० तर पंचायत समितीसाठी ११ जागा सोडण्यात आल्या असल्याची माहिती आमदार दिलीपराव देशमुख यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत रविवारी पत्रकार भवन येथे दिली.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीची गेल्या पंधरा दिवसांपासून बोलणी सुरू होती. दोन्हीही पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या असताना आघाडीचे संकेत दिले जात होते. दरम्यान, रविवारी संयुक्त पत्रकार परिषद आमदार दिलीपराव देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आ. बाबासाहेब पाटील यांनी आघाडी झाल्याचे जाहीर केले. लातूर जिल्हा परिषदेत एकूण ५८ जागा आहेत. त्यापैकी औसा विधानसभा मतदारसंघातील जागांची बोलणी सुरूच आहेत. लातूर ग्रामीण, अहमदपूर, उदगीर आणि निलंगा विधानसभा मतदारसंघातील गट व गणाच्या जागांची बोलणी पूर्ण झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मुरूड, अहमदपूर विधानसभा मतदार संघातील शिरूरताजबंद, रोकडा सावरगाव, खंडाळी, नळेगाव, जानवळ, चापोली, उदगीर विधानसभा मतदारसंघातील तोगरी, लोहारा आणि निलंगा विधानसभा मतदारसंघातील हलगरा जि़प गट सोडण्यात आला आहे, याच गटातील प्रत्येकी १ पं. स. गणाची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील २ पंचायत समितीच्या जागा राष्ट्रवादीला देण्यात आल्या आहेत. जि़पच्या १० आणि पंचायत समितीच्या ११ जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आल्या असून, उर्वरित ३९ गट आणि ८७ गण काँग्रेसकडे असल्याची माहिती आमदार दिलीपराव देशमुख, माजी आ. बाबासाहेब पाटील यांनी दिली.औसा विधानसभा मतदारसंघात जि़पचे ९ गट आणि पं.स.चे १८ गण आहेत़ या जागा वाटपांची बोलणी सुरू असून पुढील दोन दिवसात यासंदर्भात हा निर्णय होणार असल्याचे आ. दिलीपराव देशमुख यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आमदार अमित देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे, बबन भोसले, काँग्रेसचे आबासाहेब पाटील, विजयकुमार पाटील, मोईज शेख, प्रा. बी़व्ही़ मोतीपवळे, सुनीता आरळीकर आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यात सहमतीचे राजकारणजिल्ह्यात काँग्रेसने नेहमीच सहमतीचे राजकारण केले आहे. तेवढीच साथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे. बाबासाहेब पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांचा आणि आमचा गेल्या ३० वर्षांचा संबंध आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था सक्षमपणे चालविण्यासाठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी ही आघाडी करण्यात आली आहे. यापूर्वी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढले परंतु स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढलो होतो. पहिल्यांदाच जि़प, पं.स. साठी ही आघाडी झाली आहे, असेही आ. देशमुख म्हणाले.हल्ली निवडणुका विकास व कार्यक्रमांपेक्षा धर्म, संस्कृती आणि जाती-पातीवर होत आहेत. ही चिंताजनक बाब आहे़ जाती-पातीच्या आणि धर्माच्या नावावर निवडणुका होत असल्याने दरी निर्माण होण्याची शक्यता आहे़ ही चुकीची प्रथा रोखण्याची जबाबदारी निधर्मी पक्षांवर आहे. सर्वाधिक जबाबदारी काँग्रेस पक्षाची आहे, म्हणून आघाडी केली असल्याचेही आ. देशमुख म्हणाले.
लातुरात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी
By admin | Published: January 29, 2017 9:34 PM