नांदेड: भाजपा-शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात जिथे-जिथे आवश्यकता आहे तिथे आघाडी झाली पाहिजे, अशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका स्पष्ट आहे़ त्यासाठी काँग्रेसही सकारात्मक आहे, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा़अशोक चव्हाण यांनी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाडी होणार असल्याचे संकेत दिले़निवडणूक निकालावर भाष्य करताना ते म्हणाले, की काही जिल्ह्यामध्ये निश्चितच आम्ही कमी पडलो आहोत़ येणाऱ्या दोन वर्षातील निवडणुका लक्षात घेता जिथे संघटनात्मक बदल करणे अपेक्षित आहे, तिथे निर्णय घेतले जातील़ आत्मपरिक्षण केले जाईल़ मुंबई महापालिकेबाबत आमची भूमिका ‘वेट अॅण्ड वॉच’ अशीच आहे़ घडामोडी काय होतात याकडे आमचे लक्ष असून योग्य वेळी योग्य भूमिका घेऊ. काही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला यश मिळाले आहे़ नांदेडमध्ये पूर्वीपेक्षा जागा वाढल्या आहेत़ विधान परिषद, नगरपालिका नंतर जिल्हा परिषदेमध्येही नांदेड जिल्ह्यातील जनतेने काँग्रेसला साथ दिली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)राज्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीची जिथे आवश्यकता आहे, तिथे आघाडी झाली पाहिजे. याबाबत शरद पवार यांच्याशी बोलणे झाले असून दोन्ही पातळीवर सकारात्मक भूमिका आहे. - खा़ अशोक चव्हाण,प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार
By admin | Published: February 24, 2017 5:42 AM