नाशिक : महापालिका निवडणूक भाजपाने स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने ‘युती’च्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे, तर दुसरीकडे आघाडी करण्याबाबत कॉँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये अजून अधिकृत चर्चेची बैठकच न बसल्याने आघाडीची म्हैस पाण्यातच आहे. कॉँग्रेसने ब्लॉकस्तरावर समन्वयकांकडून आघाडी करण्याबाबतचा अहवाल मागविला असून, दोन दिवसांत तो प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला जाणार आहे. तर राष्ट्रवादीनेही प्रभागस्तरावर निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांची चाचपणी करत यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. महापालिका निवडणुकीसाठी सेना-भाजपा युती होणार नाही, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीतही आघाडी होते किंवा नाही, याकडे आता लक्ष लागून आहे. स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचे अधिकार उभय पक्षांच्या नेत्यांनी दिल्यानंतर प्राथमिक बैठकीत आघाडी करण्यास अनुकूलता दर्शविण्यात आली होती; परंतु राष्ट्रवादीचे नेते एकापाठोपाठ तुरुंगात जाऊ लागल्याने प्रतिमा खराब झालेल्या पक्षाबरोबर जायचे किंवा नाही, यावर कॉँग्रेसमध्ये खल सुरू आहे. राष्ट्रवादीबरोबर आघाडी न करता स्वबळावर लढण्याचाही आग्रह कॉँग्रेसमधून होत असल्याने पदाधिकाऱ्यांची पंचाइत होत आहे. कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आघाडीचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे सांगत, स्थानिक स्तरावर झालेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न चालविला आहे, तर राष्ट्रवादी आघाडीबाबत अनुकूलता दर्शवित कॉँगे्रसच्या अधिकृत होकाराच्या प्रतीक्षेत आहे. तत्पूर्वी, राष्ट्रवादीने प्रभागांमध्ये निवडून येऊ शकणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले असून, त्या ठिकाणी कॉँग्रेसचा इच्छुक उमेदवार कोण आहे, याचीही माहिती घेतली जात आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीने उमेदवारांबाबत तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांकडून दबावही वाढत असून, आघाडीची म्हैस लवकर पाण्याबाहेर यावी, अशी कामना केली जात आहे.>काँग्रेस-राष्ट्रवादीने ६१-६१ जागांवर लढावे, अशी प्राथमिक चर्चा झाली आहे; परंतु अद्याप आघाडीबाबत निर्णय झालेला नाही. येत्या दोन दिवसांत अधिकृत बैठक होऊन त्यावर निर्णय अपेक्षित आहे. - रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी>आघाडी होण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत; परंतु अंतिम निर्णय झालेला नाही. आघाडीबाबतचा अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे-पाटील हेच घेतील. आघाडी व्हावी किंवा नाही, याबाबत विखे-पाटील यांनी ब्लॉकनिहाय समन्वयकांकडून अहवाल मागितला असून, २० जानेवारीला त्यांच्या उपस्थितीत चर्चाही होणार आहे. - शरद अहेर, शहराध्यक्ष, कॉँग्रेस
नाशिकमध्ये काँग्रेस आघाडीची म्हैस पाण्यातच
By admin | Published: January 19, 2017 12:21 AM