ठाणे : पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या संकेतानुसार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आघाडी करण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम दिले होते. मुंब्य्रातील मैत्रीपूर्ण लढतींबाबत अद्याप कोणताही निर्मय झालेला नाही. दोन्ही पक्षांची गुरूवारी बैठक होणार असून त्यात प्रत्येक प्रभागानुसार जागावाटपावर चर्चा होईल. शासकीय विश्रामगृहातील दोन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीत आघाडीच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब झाले. कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि प्रभारी नारायण राणे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रभारी गणेश नाईक यांनीही आघाडीच्या दिशेने कौल दिल्याने शुक्रवारी ही बैठक पार पडली. कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसचे अनेक विद्यमान नगरसेवक शिवसेना-भाजपमध्ये दाखल झाले आहेत. शहरात जे ३३ प्रभाग आहेत, तेथील दोन्ही पक्षांची ताकद पाहून, इच्छुकांचा विचार करून गुरूवारी जागावाटपाची पुढील चर्चा सुरू होईल. मुंब्य्रात मैत्रीपूर्ण लढतींसाठी राष्ट्रवादी आग्रही असली तरी त्याबाबत निर्णय झाला नाही.निवडणुकीच्या रिंगणात स्वतंत्रपणे उतरण्यापेक्षा आघाडी करून निवडणुकीला सामोरे जावे आणि ताकद वाढवावी, अशी भावना दोन्ही पक्षाच्या नेत्यांत असल्याने आघाडीवर शिक्कामोर्तब झाले. आघाडी करूनच निवडणूक लढवायची, या निर्णयाला या सर्व पदाधिकाऱ्यांनी तत्वत: मान्यता दिल्याची माहिती मनोज शिंदे आणि आनंद परांजपे यांनी दिली. (प्रतिनिधी)
काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी पक्की
By admin | Published: January 07, 2017 3:48 AM