Maharashtra Politics: “राज ठाकरेंचा फोन आला होता का, भेटायला जाणार का?”; आमदार रवींद्र धंगेकरांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 05:48 PM2023-03-05T17:48:58+5:302023-03-05T17:50:07+5:30
Maharashtra News: भाजपच्या पारंपारिक बालेकिल्ल्याला सुरुंग लावलेल्या रवींद्र धंगेकरांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Politics: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालावरून अद्यापही राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप तसेच शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. भाजपचा ३० वर्षांचा गड उद्ध्वस्त करणारे काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. अनेक वर्षे मनसेत कार्यरत असलेल्या रवींद्र धंगेकर यांनी २०१९ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता ते काँग्रेसमधून आमदार झाले आहेत.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपा उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार मतांनी पराभव केला. या पराभवाने भाजपच्या पारंपारिक बालेकिल्ल्याला सुरुंग लागला. रवींद्र धंगेकर यांच्या विजयानंतर काँग्रेससह महाविकास आघाडीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कसबा पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर रवींद्र धंगेकर राज ठाकरे यांची भेट घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
राज ठाकरेंचा फोन आला होता का, भेटायला जाणार का?
शिवसेनेत असताना दीपक पायगुडे यांच्यामुळे राज ठाकरेंकडे आकर्षित झालो. १० वर्षे मनसेत नगरसेवक म्हणून काम केले. पण, २०१९ साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतरही राज ठाकरेंशी संवाद ठेवला. राज ठाकरेंबद्दल आदर आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या सर्वांच्या हाताखाली काम केले आहे. ठाकरे कुटुंब पूर्वीपासून माझ्या जवळचे आहे, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
दरम्यान, आमदार झाल्यावर राज ठाकरेंचा फोन आला होता का?, असा सवाल रवींद्र धंगेकरांना करण्यात आला. यावर, आजही राज ठाकरेंशी चांगले संबंध आहेत. शिवसेना आणि मनसे सोडली, पण त्यांच्यावर कधीही टीका केली नाही. कारण, कुटुंब म्हणून त्या परिवारात राहत होतो. राज ठाकरेंचा फोन आला नाही. पण, त्यांना भेटण्यास जाणार आहे, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"