ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. २३ : अभिनेता ऋषी कपूर आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. ट्विटरवरुनदेखील त्यांनी केलेलं ट्विट अनेकदा वादाचा मुद्दा ठरला आहे. मध्यंतरी ऋषी कपूर यांनी ट्विटर वरुन गांधी परिवारावर अप्रत्यक्षरित्या टीका करत देशामधील अनेक ठिकाणांना नेहरु - गांधी यांचं नाव देण्यावरुन नाराजी व्यक्त केली होती. त्या निषेधार्थ सोलापूर येथे युवक कॉंग्रेसच्या वतीने शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाला ऋषी कपूर यांचे नाव दिले असून, कपूर यांच्या निषेधार्थ घोषणाही देण्यात आल्या. यावेळी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष बाबा करगुळे, तिरुपती परकीपंडला यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. गांधी कुटुंबीयांबाबत अनुद्गार काढल्याच्या निषेधार्थ सार्वजनिक स्वच्छतागृहाला कपूर यांचे नाव दिले आहे, असे करगुळे यांनी आज सांगितले. एकट्या दिल्ली शहरामध्येच गांधी कुटुंबाची 64 ठिकाणांना नावे आहेत, असे कपूर यांनी ट्विटरवरून सांगत छायाचित्रही शेअर केले होते. देशातील महत्त्वाच्या संस्थांना आणि ठिकाणांना कॉंग्रेस सरकारच्या काळात गांधी परिवारातील सदस्यांची नावे दिल्याबद्दल कपूर यांनी एका पाठोपाठ एक ट्विट करत कॉंग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला होता. देशासाठी योगदान दिलेल्या व्यक्तींची नावे महत्त्वाच्या ठिकाणांना देण्याची मागणीही त्यांनी केली. वांद्रे-वरळी "सी लिंकला लता मंगेशकर किंवा जे. आर. डी. टाटा यांचे नाव द्यावे, असे सांगत "देशाला बापाचा माल समजू नका. जर दिल्लीतील रस्त्यांच्या नावांमध्ये बदल केला जाऊ शकतो, तर गांधी परिवारातील सदस्यांच्या नावाने असलेल्या महत्त्वाच्या संस्था आणि ठिकाणांचेही नामकरण करा. ज्यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे, अशा व्यक्तींची नावे महत्त्वाच्या संस्थांना द्या. प्रत्येक ठिकाणाला गांधी परिवारातील व्यक्तीचे नाव देण्यास माझा विरोध असून, याबाबत सर्वांनी विचार करावा, असेही कपूर यांनी म्हटले होते.
स्वच्छतागृहाला ऋषी कपूरचे नाव देवून काँग्रेसने केला पलटवार
By admin | Published: May 23, 2016 5:53 PM