ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १२ - राष्ट्रवादी काँग्रेसने कुठलाही भ्रष्टाचार किंवा घोटाळा केलेला नाही. मात्र आमच्यावर घोटाळयाचे आरोप आणि आमच्यामागे तपासाचे शुक्लकाष्ठ काँग्रेस नेत्यांनी लावले असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला. ते अकोला येथे बोलत होते.
आमचे सरकार राज्यात सत्तेवर असताना काँग्रेसला शिवसेना-भाजपपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस जास्त डाचत होता. पृथ्वीराज चव्हाणांसारख्या काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादीला त्रास देण्यासाठी तपासाचे शुक्लकाष्ठ मागे लावले असा आरोप प्रफुल्ल पटेल यांनी केला.
अल्पसंख्यांक, दलित काँग्रेसबरोबर असतात. काँग्रेसच जुना पक्ष आहे असे म्हणतात पण आता तशी स्थिती राहिलेली नाही. काँग्रेसचे कुठे वर्चस्व आहे अशी स्थिती राहिलेली नाही असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एक कार्यक्रमात संबोधित करताना त्यांनी हे आरोप केले.
काँग्रेस पक्ष स्वत: तर बुडाला पण आम्हाला सोबत घेऊन बुडाला. राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा उसळी घेऊन उभी राहिल असा आशावाद पटेलांनी व्यक्त केला.