मुंबई : आगामी महापालिका, नगरपालिका निवडणुकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती राबविण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाला प्रदेश काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. तीन ऐवजी दोन सदस्यांचा प्रभाग असावा, असा ठराव प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत गुरुवारी मंजूर करण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीत काँग्रेसचेही मंत्री उपस्थित होते. त्यांच्या सहमतीने निर्णय झालेला असताना प्रदेश काँग्रेसने असा ठराव करून स्वतःच्या सरकारपुढे प्रश्न निर्माण केला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पटोले म्हणाले की, काँग्रेसच्या बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा त्याला विरोध आहे.
त्यामुळे तीनऐवजी दोन सदस्यांचा प्रभाग असावा, अशी काँग्रेसची भूमिका आहे. यासंबंधीचा ठरावही कार्यकारिणीत एकमुखाने मंजूर केला असून याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काय साध्य करायचेय? ज्येष्ठ नेत्याचा सवाल- मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय चर्चेला येणार होता हे काँग्रेस नेत्यांना माहिती होते. तरीही काँग्रेस नेत्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत यावर काही भाष्य केले नाही. - हा निर्णय होऊ दिला आणि आता वेगळा ठराव करून प्रदेश काँग्रेस समितीला काय साध्य करायचे आहे? अशाने स्वतःच्या सरकारपुढे आपण स्वतः प्रश्न निर्माण करत आहोत. - मात्र आमचे नेते स्वतःच्या हिताच्या राजकारणाशिवाय दुसरे काहीही करू शकत नाहीत अशी उद्विग्न प्रतिक्रिया काँग्रेसच्याच एका ज्येष्ठ मंत्र्याने दिली.