काँग्रेसचा एल्गार : ३१ ऑगस्टपासून कोल्हापुरातून जनसंघर्ष यात्रेला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 04:25 PM2018-08-20T16:25:47+5:302018-08-20T16:28:45+5:30
येत्या ३१ ऑगस्टपासून कोल्हापुरातून जनसंघर्ष यात्रा काढणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पुण्यात दिली.
पुणे :सरकारच्या धोरणांमधून निर्माण झालेली स्थिती बदलण्यासाठी काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या ३१ ऑगस्टपासून कोल्हापुरातून जनसंघर्ष यात्रा काढणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पुण्यात दिली.
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, चारुलता टोकस उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली.
ते म्हणाले की, भाजपने आत्तापर्यंत फक्त घोषणा केल्या असून फक्त मोजक्या ऊद्योगपतींचा विकास केला आहे. त्यांनी लोकशाही धोक्यात आणली असून विविध माध्यमातून काँग्रेस त्याचा निषेध करत आहे. आमची ही भूमिका लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ३१ तारखेला सुरु होणारी ही यात्रा ७ आणि ८ सप्टेंबरला पुण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.यावेळी त्यांनी देशातील सामाजिक वातावरण गढूळ झाल्याचे म्हटले.डॉ दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, गौरी लँकेशा यांच्या हत्येनंतर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
अशोक चव्हाण म्हणाले की,
- सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे.
- देशात महिलांवर अत्याचार सुरु आहेत.
- माध्यमांची गळचेपी सुरु आहे.
- १५ हजार अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
- रोजगाराची स्थिती गंभीर असून बेरोजगारी कायम आहे. दीड कोटी लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत.
- देशातील चार न्यायाधीशांनी लोकशाही धोक्यात आल्याचे जाहीर केले.