'वंचित'ला रोखण्यासाठी काँग्रेसकडे तगडा प्लॅन; दलित नेत्यांची होणार चांदी !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 02:00 PM2019-08-28T14:00:50+5:302019-08-28T14:01:03+5:30

वंचितमध्ये एमआयएम आणि आंबेडकर यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे समजते. यावरून वंचित आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी स्वबळावर निवडणूक लढणार असं चित्र आहे. मात्र अशा स्थितीत कुणाच्याच हाती काही लागणार नाही, असंही होण्याची शक्यता आहे.

Congress plans to prevent 'VBA'; Dalit leaders to get jackpot | 'वंचित'ला रोखण्यासाठी काँग्रेसकडे तगडा प्लॅन; दलित नेत्यांची होणार चांदी !

'वंचित'ला रोखण्यासाठी काँग्रेसकडे तगडा प्लॅन; दलित नेत्यांची होणार चांदी !

googlenewsNext

मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने शानदार विजय मिळवला. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीच्या जागा कमी होईल, अशी शक्यता असताना प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसच्या अपेक्षांना धक्का बसला आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेला देखील प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेससोबत आघाडी करण्याचा इरादा दिसत नाही. त्यामुळे काँग्रेसने आंबेडकरांचा प्रभाव कमी करण्यासाठी तगडा प्लॅन बनवला आहे.

लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेला होऊ नये, यासाठी महाराष्ट्र काँग्रेसने हालचाली सुरू केल्या होत्या. परंतु, काँग्रेस नेत्यांना आंबेडकरांकडून अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही. आंबेडकरांनी काँग्रेसला सुरुवातीला ४० जागांची ऑफर दिली होती. त्याचवेळी राज्यभर इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतींचा सपाटा सुरूच ठेवला होता. त्यानंतर आंबेडकरांनी काँग्रेसला १४४ जागांची ऑफर दिली. तसेच राष्ट्रवादीची साथ सोडण्याची अट घातली.

आंबेडकरांकडून काँग्रेसला मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीमुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत. याची दखल काँग्रेस पक्षश्रेष्ठीने घेतल्याचे समजते. तसेच आंबेडकरांची वाट न पाहता, निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना नेत्यांना करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी आंबेडकरांचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाय योजना करण्यात येणार आहे. राज्यातील स्थानिक नेत्यांनी ठेवलेल्या प्रस्तावानुसार, अल्पसंख्यांक अर्थात मुस्लीम समाजाला किमान २० जागा आणि दलित समाजाला राखीव जागा वगळून अधिक जागा द्याव्या. या व्यूहरचनेतून आंबेडकरांचा प्रभाव कमी करणे शक्य असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांना वाटते. यामुळे अनेक दलित नेत्यांना उमेदवारीची लॉटरी लागणार हे नक्की.

दुसरीकडे वंचितमध्ये एमआयएम आणि आंबेडकर यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे समजते. यावरून वंचित आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी स्वबळावर निवडणूक लढणार असं चित्र आहे. मात्र अशा स्थितीत कुणाच्याच हाती काही लागणार नाही, असंही होण्याची शक्यता आहे. हे रोखण्यासाठी काँग्रेस दलित आणि अल्पसंख्यांक समाजाला वंचित ठेवणार नाही, हे निश्चित.

 

Web Title: Congress plans to prevent 'VBA'; Dalit leaders to get jackpot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.