- कमलेश वानखेडे नागपूर : काँग्रेसच्या १८ आमदारांनी सोमवारी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे व संघटन महासचिव केसी वेणुगोपाल यांची भेट घेतली. या भेटीत आमदारांनी आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. यावर राहुल गांधी हेच कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील आमदारांशी भेटीसाठी इच्छुक आहेत, लवकरच ते आमदारांची वैयक्तिक भेट घेऊन त्यांचे म्हणणे एकूण घेणार असल्याचे वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले. हे ऐकून भेटीसाठी गेलेले आमदार काहीसे सुखावले.संसदीय कामकाजाची माहिती देण्यासाठी ५ व ६ एप्रिलला संसदेत आयोजित अभ्यासवर्गात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील काँग्रेसचे आमदार दिल्लीत दाखल झाले. यापैकी संग्राम थोपटे, विकास ठाकरे, अभिजीत वंजारी, सुरेश वरपूरकर, राजेश राठोड, लहू कानडे, अमित झनक, कैलास गोरंट्याल, दयाराम वानखेजे, राजू पारवे, संजय जगताप यांच्यासह १८ आमदारांनी के.सी. वेणुगोपाल व खरगे यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या आमदारांना मिळत असलेल्या एकूणच वागणुकीबद्दल आमदारांनी नाराजी व्यक्त केली.
महामंडळांचे वाटप कधी?बडे नेते मंत्रिपदात खूश आहेत. आमदारांकडे कुणाचेच लक्ष नाही. महामंडळांवर आमदारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. राष्ट्रवादी व शिवसेनेची अडचण असेल, तर किमान काँग्रेसच्या कोट्यात येणारी महामंडळे जाहीर करावी, अशी मागणी आमदारांनी केली. निधीचे सम प्रमाणात वाटप करावे व विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा निकाली काढावा, अशी मागणी केली.
पालकमंत्र्यांवर नाराजीकाही आमदारांनी पालकमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. काही जिल्ह्यांत जिल्हास्तरीय समित्याही नेमलेल्या नाहीत. विशेष कार्यकारी अधिकारी पदावर कार्यकर्त्यांना नियुक्त्या दिलेल्या नाहीत.
कमी मतांनी पडलेल्या जागांकडे लक्ष द्याविदर्भासह राज्यातील विधानसभेच्या काही जागा अत्यंत कमी मतांच्या फरकाने पडल्या आहेत. त्या जागांकडे हायकमांडने वेळीच लक्ष दिले, नियोजन केले व मंत्री, तसेच संघटनेच्या माध्यमातून काम करवून घेतले, तर या जागा जिंकता येऊ शकता. त्यामुळे अशा जागांवर लक्ष केंद्रित करावे, अशी विनंतीही आमदारांनी केली.