पवारांच्या सल्ल्याला काँग्रेसची साद; स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीसाठी तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 11:15 AM2019-12-19T11:15:37+5:302019-12-19T11:16:26+5:30
भाजपचे वाढते वर्चस्व कमी करण्यासाठी पुढील काळात होणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकत्र लढाव्या अशा सूचना पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या.
मुंबई - स्थानिक निवडणुकांत देखील महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यासाठी प्रयत्न व्हावेत असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिला होता. त्याला काँग्रेसकडून प्रतिसाद देण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत एकत्र येण्यासाठी विचार करत असल्याचे म्हटले आहे.
देशात आता भाजपविरोधी वातावरण तयार झाले आहे. भाजपला दूर ठेवण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. त्यामुळे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र लढावे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिला होता.
राज्यातून भाजपला दूर करण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली आहे. आता भाजपचे वाढते वर्चस्व कमी करण्यासाठी पुढील काळात होणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकत्र लढाव्या अशा सूचना पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या.
यानंतर थोरात यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जाईल, असं म्हटलं आहे. मागील एक महिन्यात आमच्या तिन्ही पक्षातील समन्वय आणि संवाद पाहता महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या पद्धतीने काम करेल, असंही थोरात यांनी सांगितले.