Praniti Shinde News: मतदान कामावर केले पाहिजे. श्रीरामावर नाही. कर्म महत्वाचे आहे, धर्म नाही. भाजपचा उमेदवार तुमच्याकडे आल्यावर त्याला एकच प्रश्न विचारा, त्यांची बोलती बंद होईल. त्यांना मागील दहा वर्षात भाजपच्या खासदारांनी काय केले? जेव्हा जेव्हा त्यांना कळते की, त्यांची बाजू कमी आहे आणि आपली जास्त आहे. तेव्हा तेव्हा ते जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करतात. भाजपा ४०० काय १०० पारही जाणार नाही, असा मोठा दावा काँग्रेस नेत्या आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रचार, सभा, कार्यकर्त्यांचे मेळावे यांना वेग आला आहे. उपस्थितांना संबोधित करताना तसेच मीडियाशी बोलताना प्रणिती शिंदे यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. सोलापूरचे खासदार संसदेत बोलले असते तर आपल्याला पाणी मिळाले असते. त्यामुळे जे खासदार संसदेत बोलणार नसतील तर काय उपयोग? तुमच्यासोबत धोका, विश्वासघात झाला आहे. मागच्या १० वर्षात मतदारांनी भाजपाला भरभरून दिले. मात्र त्यांनी तुम्हाला ठेंगा दिला. भाजपाने तुम्हाला धोका दिला. तुमचा विश्वासघात केला, या शब्दांत प्रणिती शिंदे यांनी हल्लाबोल केला.
भाजपा ४०० काय १०० पारही जाणार नाही
भाजपाने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली, असा मोठा आरोप करत, गेल्या १० वर्षात सोलापूर लोकसभा मतदारसंघावर खूप मोठा अन्याय झाला आहे. दिल्लीपर्यंत तुमचा आवाज घेऊन जाण्यासाठी ही लढाई लढत आहे. ४०० सोडा, पण १०० पारही जाणार नाहीत. कारण त्यांच्याकडे तसा रिपोर्ट आहे, असा दावा प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
दरम्यान, भाजपाच्या विचारसरणीमुळे सोलापूर २० वर्ष मागे गेला आहे, तर आपला देश ५० वर्ष मागे गेला आहे. ते फक्त गाजर दाखवत आहेत. जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे. तोपर्यंत आम्ही तुमचा आवाज दाबू देणार नाही. मला फक्त एकदा आशीर्वाद द्या. मी ईडीबिडीला घाबरत नाही, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.