Praniti Shinde On BJP: “योगी, महाराजांची जागा मठात, राजकारणात आले की देशाचं वाटोळं होतं”: प्रणिती शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 09:59 AM2022-03-14T09:59:14+5:302022-03-14T09:59:52+5:30
Praniti Shinde On BJP: एक दोन पराभव झाले म्हणून काय झाले, हा ईव्हीएम घोटाळा असल्याचा दावा प्रणिती शिंदे यांनी केला.
सोलापूर: देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणूक निकालात काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर भाजप नेत्यांनी काँग्रेसवर टीका केली. राज्यातील भाजप नेत्यांनीही महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. एकूण राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. योगी, महाराज यांची जागा मठात आहे. ते राजकारणात आले की, देशाचे वाटोळे होते, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
सोलापूर येथील एका सभेत बोलताना प्रणिती शिंदे यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजप सरकारचा समाचार घेत कृषी कायद्यासह अन्य मुद्द्यांवरून टीकास्त्र सोडले. उत्तर प्रदेशची निवडणूक आल्यामुळेच तीन काळे कृषी कायदे रद्द करण्यात आले, याचा पुनरुच्चार करत, वर्षभर शेतकऱ्यांनी लढा दिला, ७०० शेतकऱ्यांचा बळी तुम्ही घेतला आणि मग कायदे रद्द केले, याबद्दल लाज वाटायला हवी, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली.
योगी, महाराजांची जागा मठात, राजकारणात आले की देशाचे वाटोळे होते
योगी आणि महाराजांबद्दल आम्हाला मान आहे. परंतु, त्यांचे स्थान मंदिर आणि मठात आहे, राजकारणात नाही. ज्या ज्या वेळेस योगी आणि महाराज राजकारणात आले, तेव्हा देशाचे वाटोळे सुरू होते, असा घणाघात प्रणिती शिंदे यांनी केला. जे काम करतात, त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे महत्त्वाचे आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर कामाला महत्त्व द्या. संविधान जिवंत ठेवायचे असेल, तर कामाला महत्त्व दिले पाहिजे, असे सांगत काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी कधीही जात-पात केली नाही. तुम्ही त्यांना निवडून दिले. कारण ते कामाला प्राधान्य द्यायचे, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.
काम केलीयत, आपण का घाबरतो
आपण अजिबात घाबरता कामा नये, आपण कामे केली आहेत. या देशाला बलिदान कुणी दिले असेल तर ते काँग्रेसने दिले आहे. देशात कसोटीच्या पातळीवर उतरुन काँग्रेसनी कामे केली आहेत, तरीही काँग्रेसचा कार्यकर्ता धडाडीने लढताना दिसत नाही, त्यामुळे इथून पुढे आपण कामाच्या पातळीवर राजकीय लढा द्यायचा आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी खचून न जाता कोणत्याही निवडणुकीत पूर्ण ताकदीने लढण्याची गरज असल्याचे प्रणिती शिंदे यांनी सांगितले. एक दोन पराभव झाले म्हणून काय झाले, यामध्ये ईव्हीएम घोटाळा असू शकतो. मात्र, एक गठ्ठा मतदान केले, तर ईव्हीएम खराब होत नाही, हे मला महिती आहे, असा दावा प्रणिती शिंदे यांनी केला.