Praniti Shinde: “ईडीचा गेम त्यांच्यावरच उलटणार, आमची तशी संस्कृती नाही”; प्रणिती शिंदेंची केंद्रावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 07:14 PM2022-04-06T19:14:03+5:302022-04-06T19:15:08+5:30
Praniti Shinde: काँग्रेसकाळात सिलेंडर ३५० झाले होते, तेव्हा त्यांच्या मंत्र्यांनी मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठवल्या होत्या.आता आम्ही काय पाठवायचे, असा सवाल प्रणिती शिंदेंनी केला.
सोलापूर: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी गेल्या असताना उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर निशाणा साधला. यानंतर आता सोलापूरमध्ये काँग्रेसने केलेल्या आंदोलनावेळी पुन्हा एकदा प्रणिती शिंदे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत ईडीचा गेम त्यांच्यावरच उलटणार असल्याचा दावा प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेसकडून देशभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर-सोलापूरमध्ये करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला. “ईडी जिसकी मम्मी है, वो सरकार निकम्मी है”, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
आमची तशी संस्कृती नाही
आता जे या पद्धतीने ईडीचा वापर करत आहेत, हाच गेम त्यांच्यावरच उलटणार आहे. आता तेच होताना देखील दिसत आहे. शेवटी या सगळ्या संस्था स्वायत्त आहेत. काँग्रेसने कधी त्यांचा वापर केलेला नाही. आमची तशी संस्कृती देखील नाही. कधी ना कधी ते उलटतेच, असे टीकास्त्र प्रणिती शिंदे यांनी सोडले. ईडी ठराविक गुन्ह्यांमध्येच तपास करते. त्यांनी तशाच प्रकारे निवडक गुन्ह्यांमध्ये तपास करायला हवा. पण आता कुणी छोटे काही केले तरी हे ईडी आणतात. परवा कोल्हापुरात चंद्रकांत पाटील म्हणाले की, तुम्ही पेटीएमवर काही केले तरी ईडी येईल. म्हणजे यांनी हे सिद्ध केले आहे की ईडी त्यांच्यासाठीच काम करते आणि मागच्या दारात बसली आहे, असा टोला प्रणिती शिंदे यांनी लगावला.
दरम्यान, देशात महागाई सातत्याने वाढत आहे. पण मोदी सरकार ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. गोरगरिबांना छळणारे मुद्दे असताना मोदी सरकार आणि भाजप सरकार हे मुद्दे बाजूला ठेवून वेगळेच मुद्दे हाताळत आहे. जात-पात-धर्म यावरच अजेंडा जात आहे. काँग्रेसच्या काळात सिलेंडर ३५० झाले होते, तेव्हा त्यांच्या मंत्र्यांनी आमचे पंतप्रधान मनमोहन सिंह यांना बांगड्या पाठवल्या होत्या. बांगड्या पाठवणे कमी असण्याचे प्रतीक नाही. त्यातून त्यांनी काय सिद्ध केले? आता १००० रुपये सिलेंडर झाले आहे. तर आता आम्ही त्यांना नेमके काय पाठवू, अशी खोचक विचारणाही प्रणिती शिंदे यांनी केली.