मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच मतदारसंघात इच्छुकांची गर्दी पहायला मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महत्वाचा वणी विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून, वणीचा गड राखण्यासाठी भाजपला यावेळी मोठी कसरत करावी लागणार आहेत. तर लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून काँग्रेसला मिळालेला जनाधार भाजपच्या विजयाला अडसर ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
कोळशाचा काळाबाजार, त्यातील वाहतूक, चोरटी विक्री व एकूणच उलाढालीतील पैसा, यामुळे वणी विधानसभा मतदारसंघ आर्थिकदृष्ट्या भक्कम समजला जातो. त्यामुळे या ठिकाणी आमदार होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्याप्रमाणात आहेत. २०१४ मध्ये याच मतदारसंघात भाजपचे विद्यमान संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा अनपेक्षित विजय झाला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत वणी मतदारसंघात लोकांनी काँग्रेसला दिलेला पाठींबा, भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे.
वणी विधानसभा मतदार संघाचा समावेश असलेल्या चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदार संघात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बाळू धानोरकर हे राज्यातून काँग्रेसचे एकमेव खासदार निवडून आले आहेत. त्यातच वणी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमदेवार हंसराज अहिर यांना मोजक्याच मतांची आघाडी मिळाल्याने भाजपसाठी हे आगामी निवडणुकीत धोकादायक ठरू शकते. तर काँग्रेसला मिळालेला जनाधार विधानसभा निवडणुकीत भाजपला अडसर ठरणार असल्याची चर्चा मतदारसंघात पहायला मिळत आहे.
चारदा खासदार राहिलेले आणि सलग १५ वर्षे निवडून येणारे माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा काँग्रेसचे धानोरकर यांनी लोकसभा निवडणुकीत केलेला पराभव म्हणजे, काँग्रेसला मिळालेला जनाधार समजला जात आहे. वणी विधानसभा मतदारसंघात सुद्धा लोकसभेत काँग्रेसला चांगली मते मिळाली आहे. त्यामुळे वणीत भाजपसाठी आगामी निवडणूक अटीतटीची समजली जात आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती निश्चित मानली जात आहे. त्यामुळे वणी मतदारसंघ भाजपकडे राहणार असल्याचे बोलले जात आहे. तर आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे असणार असल्याचे निर्णय अंतिम होण्याचे अंदाज आहे. तर भाजपकडून संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे नाव चर्चेत आहे, मात्र ऐनवेळी चेहरा बदलण्याचा निर्णय सुद्धा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून परंपरागत उमेदवार वामनराव कासावार यांचे नाव निश्चित माणले जात आहे. पण तरीही काँग्रेसकडून नवे चेहरे गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत हे विशेष.