मुंबई - 2014 विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि त्यानंतर दिग्गज नेत्यांचे पक्षांतर यामुळे काँग्रेस पक्ष कमकुवत झाला होता. त्यातच लोकसभा निवडणुकीत राज्यात केवळ एक खासदार निवडून आल्यानंतर काँग्रेसची अवस्था आणखीच बिकट झाली होती. या संकटातून बाहेर पडत, काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात सत्तेत सामील होण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे नवीन प्रदेशाध्यक्ष राज्य काँग्रेससाठी लक्की ठरल्याची चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्य काँग्रेसची जबाबदारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे होती. या निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात दारुण पराभव पत्करावा लागला. तर खुद्द अशोक चव्हाण आपली जागा वाचवू शकले नव्हतं. त्यानंतर चव्हाण यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला होती.
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील देखील भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे एकाचवेळी विरोधीपक्षनेता आणि प्रदेशाध्यक्षपद रिक्त झाले होते. विरोधीपक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार तर प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर मतचाचण्यांमध्येही काँग्रेसला 20 पेक्षा कमी जागा दाखवण्यात आल्या होत्या. अशा बिकट स्थितीत थोरात यांनी काँग्रेसला 2014 एवढ्याच जागा जिंकून दिल्या. यामध्ये शरद पवारांचा झंझावात महत्त्वाचा ठरला. तर यश हे थोरातांच्या पारड्यात पडले हे देखील तेवढंच खर आहे.
दरम्यान शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेल्या दुराव्यामुळे विरोधात बसण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेची लॉटरी लागली. त्यामुळे काँग्रेससाठी प्रदेशाध्यक्ष थोरात लक्की ठरले असंच म्हणाव लागत आहे.