Prithviraj Chavan Reaction Maharashtra Lok sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीचे कल हळूहळू स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे. देशात एनडीएला जनाधार मिळताना दिसत असून, इंडिया आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. राज्यातही महाविकास आघाडीने कमबॅक केले असून, महायुतीचे उमेदवार अनेक ठिकाणी पराभूत होताना दिसत आहेत. यातच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपा आणि महायुतीवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांचा हा वैयक्तिक पराभव आहे, या शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निशाणा साधला.
मीडियाशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, देशातील जनतेने नरेंद्र मोदीच्या विरोधात कौल दिला आहे. गेल्या निवडणूकीमध्ये भाजपाला स्व-बळावर २७२ जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्या मिळालेल्या नाहीत. हा नरेंद्र मोदींचा वैयक्तिक पराभव आहे. भाजपा सरकार स्थापन करणार असेल तर प्रश्न असा की, पक्ष आणि पक्षातील नेते पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा नेता म्हणून निवडतील की, दुसरा कोणत्या पर्यायाचा निवडतील कारण मोंदीना ७५ वर्ष पूर्ण होत आहे त्यामुळे याचा विचारही केला पाहिजे, असे स्पष्ट मत पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.
चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार यांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले जाऊ शकते
इंडिया आघाडी आणि एनडीएला मिळत असलेल्या जागांमध्ये फार मोठा फरक दिसत नाही. एनडीएतील काही घटक पक्षांना घेऊन काँग्रेस सत्ता स्थापन करू शकते. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले जाऊ शकते. जर ज्यांना निमत्रंण दिले तर त्यांनाबरोबर घेऊन एक मोठी आघाडी तयार होईल, असा प्रयत्न करण्यास हरकत नसावी. कारण, नरेंद्र मोदी आणि अमित शाह हाच प्रयत्न करतील. ते आमच्या घटक पक्षांपैकी कोणाला तरी फोडण्याचा प्रयत्न करतील, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
दरम्यान, ताजी आकडेवारी पाहता, आम्ही जो महाविकास आघाडीचे ३२-३३ जागांचा अंदाज व्यक्त केला होता, तो अंदाज खरा ठरतो आहे. जागा वाटापमध्ये गोंधळ झाला नसता, तर एक-दोन जागी पराभव झाला नसता. महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष खूप चांगल्या प्रकारे समन्वय निर्माण झाले आहे. नेत्यांपासून तळगळापर्यंत सर्वांनी एकमेकांना सहकार्य केले, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.