“तीन पक्षाची आघाडी करावी लागली, सांगलीचा तिढा सुटला नाही”; पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 06:22 PM2024-04-25T18:22:21+5:302024-04-25T18:22:41+5:30
Congress Prithviraj Chavan News: मोदींचा पराभव करून राज्यात मविआ व दिल्लीत इंडिया आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
Congress Prithviraj Chavan News: २०१९ मध्ये निकाल वेगळा लागला असता, तर आघाडी करायची वेळ आली नसती. भाजपाला पुन्हा पाच वर्षे सत्तेत येऊ द्यायचे नाही, या विचारानेच आघाडीत सहभागी व्हावे लागले. आधी केवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी होती. मात्र, २०१९ रोजी परिस्थिती अशी आली की, आघाडी करावी लागली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे आमदार जास्त होते. आपण तिसऱ्या क्रमांकावर होतो. मनावर दगड ठेवून निर्णय घ्यावा लागला, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
सांगलीत काँग्रेसचा मेळावा घेण्यात आला. यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगलीच्या जागेच्या वादावरही स्पष्ट शब्दांत भाष्य केले. सांगलीतून लोकसभा उमेदवारीसाठी एकच नाव समोर आले होते. अगदी मुंबईपासून दिल्लीपर्यंत या नावाबाबत कोणाचेही दुमत नव्हते. काँग्रेसच्या केंद्रीय निवड समितीचेही नव्हते. महाविकास आघाडीत चर्चा करण्यासाठी नेमलेल्या काँग्रेस समितीचेही नव्हते. पण, नंतर बरेच राजकारण झाले. यात आपण जाणार नाही. सांगलीची जागा परंपरागत आहे. काही अपवाद झाले. मागच्या वेळी असेच राजकारण झाले. उमेदवारी मिळाली पण चिन्ह मिळाले नाही. सांगलीबाबत काँग्रेस पक्षात कोणाचा वाद नव्हता, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.
राजकारण खूप मोठे आहे, हळूहळू ते पुढे येईल
सांगलीचा तिढा सुटला नाही. याचे राजकारण खूप मोठे आहे. हळूहळू ते पुढे येईल. जो वाटा दोन पक्षाच्या आघाडीत मिळणार होता. तो तीन पक्षात मिळणार नव्हता. ज्या जागा निवडून येतील अशा जागा घ्या, असे यावर आम्ही ठाम होतो. त्यात एक नंबर सांगलीची जागा होती, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. सांगलीबाबतचा निर्णय सूर्यप्रकाशा इतका स्वच्छ होता. पण निर्णय सर्वोच्च पातळीवर घडला आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.
काहीही झाले तरी राज्यात मविआ व देशात इंडिया आघाडीचा विजय झालाच पाहिजे
भाजपाच्या हाती सत्ता जाऊ नये म्हणून २०१९ साली तीन पक्षांचे आघाडी सरकार स्थापन करण्यात आले. सरकार चांगेल काम करत होते नंतर शिवसेना पक्ष फोडला, आमदार खरेदी केले, पदांचे आमिष दाखवले, साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर सर्वोच्च पातळीवरून झाला. महाराष्ट्रातील या तोडफोडीला नरेंद्र मोदी यांचा राजश्रय होता, त्यांच्या संमतीनुसार हे घडले, हा सर्वात मोठा राजकीय भ्रष्टाचार आहे. निवडणुकीत विरोधकांची फाटाफूट झाली की भाजपाचे फावते म्हणून विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. काहीही झाले तरी राज्यात मविआ व देशात इंडिया आघाडीचा विजय झालाच पाहिजे, नाहीतर पुढच्या पिढीचा शाप लागेल. राज्यात मविआ व दिल्लीत मोदींचा पराभव करुन इंडिया आघाडीचे सरकार येईल. सांगली जिल्ह्यातील काँग्रेस एकसंध व ताकदवर राहिली पाहिजे व मोदींचा पराभव झाला पाहिजे हे दुहेरी आव्हान पेलावे लागणार आहे व आपण हे इंद्रधनुष्य पेलाल असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मविआ म्हणून तीन पक्षाची आघाडी करावी लागली आणि त्याची चूक सांगलीच्या जागेबाबत भोगावी लागते. मित्र पक्ष शिवसेनेने सांगलीबाबत हट्ट सोडला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत सांगलीचा प्रश्न सुटला नाही. पर्याय दिला गेला, तोही पर्याय मान्य झाला नाही. शेवटी शेवटी काही तरी चुकले आहे हे मित्र पक्षाला समजले आणि मग एक एक विधानपरिषद घ्या, आमच्या कोट्यातील घ्या अशा ऑफर येऊ लागल्या, असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.