“भाजपकडून अजित पवारांना मुख्यमंत्री पदासाठी शब्द देण्यात आलाय”; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 02:20 PM2023-07-03T14:20:53+5:302023-07-03T14:21:56+5:30

Maharashtra Political Crisis: काही महिन्यांपासून वाटाघाटी सुरू होत्या. जाहीरपणे बोललो होतो, पण त्यामुळे अडचणीत आलो, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

congress prithviraj chavan claim bjp has given word to ajit pawar for the post of chief minister | “भाजपकडून अजित पवारांना मुख्यमंत्री पदासाठी शब्द देण्यात आलाय”; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

“भाजपकडून अजित पवारांना मुख्यमंत्री पदासाठी शब्द देण्यात आलाय”; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

googlenewsNext

Maharashtra Political Crisis: अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणात मागील साडेतीन वर्षांत तिसरा महाभूकंप झाला. यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे कराड येथे जाऊन शरद पवार यांनी मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन केल्याचे बोलले जात असताना आता दुसरीकडे, राजकीय वर्तुळातून अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत. दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यातच आता भाजपकडून अजित पवारांना मुख्यमंत्री पदासाठी शब्द देण्यात आला आहे, अशी आमची माहिती आहे, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. 

शरद पवार यांनी कराड येथे जाऊन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शरद पवारांना समर्थन देण्यासाठी प्रीतीसंगमावर आलोय. ते आमच्या गावी आले आहेत, त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही इथे आहोत. शरद पवार हे विरोधीपक्षांच्या आघाडीत भक्कमपणे आहेत. महाविकास आघाडी आहे तशीच राहणार आहे. काही माणसं गेली आहेत, त्यामुळे तेवढा परिणाम होईल, पण तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत, तो त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. 

भाजपकडून अजित पवारांना मुख्यमंत्री पदासाठी शब्द देण्यात आला आहे

पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, जाहीरपणे बोललो होतो, पण त्यामुळे अडचणीत आलो. काही महिन्यांपासून वाटाघाटी चालू होत्या. असे घडत आहे, हे माहिती होते. अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाचा शब्द असल्याची आमची माहिती आहे. एकनाथ शिंदेंना बाजूला करुन किंवा अध्यक्षांकडून त्यांच्या विरोधात निकाल घेऊन अजित पवारांना मुख्यमंत्रिपद दिले जाऊ शकते. मात्र आम्ही ताकदीने भाजपविरोधात लढत राहू, असा निर्धार पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखवला. 

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने आता काँग्रेस हा महाविकास आघाडीमधील  मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेत्यांकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात येत आहे. ज्या पक्षाचे अधिक सदस्य त्यांचा विरोधी पक्षनेता व्हायला पाहिजे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: congress prithviraj chavan claim bjp has given word to ajit pawar for the post of chief minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.