Congress Prithviraj Chavan News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात येताना दिसत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच नाराज नेते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. माजी आमदार व गोंदियाचे भाजपा नेते गोपाल अग्रवाल यांनी पक्षाला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा मोठा दावा करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खुर्ची डळमळीत असल्याचे म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत विदर्भातील जनतेने काँग्रेस मविआला चांगली साथ दिली. विधानसभा निवडणुकीत यापेक्षाही चांगले यश देतील. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्या भाजपा महायुती सरकारला घालवल्याशिवाय जनता शांत बसणार नाही. महायुतीला विधानसभा निवडणुकीत १०० जागाही मिळणार नाहीत. तसेच मोदी सरकारची खुर्ची डळमळीत झाली आहे. वाजपेयी सरकारच्या १३ महिन्याच्या सरकारची पुनरावृत्ती होईल, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी बोलताना केला.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष १०० पेक्षा जास्त जागांवर विजयी होईल
यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजपा सरकार बहिणींच्या साडीवर १८ टक्के जीएसटी लावून लुटते आणि १५०० रुपये देते. भाजपा बजरंग बलीच्या नावाने, श्रीरामाच्या नावाने मते मागते पण लोकसभा निवडणुकीत त्यांना श्रीरामही पावले नाहीत आणि बजरंग बलीही पावले नाहीत. जेव्हा जेव्हा विदर्भाची काँग्रेसला साथ मिळते त्या त्या वेळेस महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता येते. विदर्भ काँग्रेसची भूमी आहे, या मातीतच भारतीय जनता पक्षाला गाडून विजयाची पताका उभारु. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष १०० पेक्षा जास्त जागांवर विजयी होईल, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.
दरम्यान, भाजपा व काँग्रेसमध्ये विचारधारेची लढाई आहे. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढून देश जोडण्याचे काम केले व डरो मतचा संदेश दिला. पण काही शक्ती देशाचे विभाजन करु पाहत आहेत त्यांना उत्तर देण्याची आता वेळ आली आहे. भाजपा महायुती सरकार आयाराम गयाराम सरकार आहे, या सरकारला बाहेरचा रस्ता दाखवण्यास राज्यातील जनता तयार आहे. विदर्भाची जनतेने नेहमीच काँग्रेस साथ दिली आहे आता विधानसभा निवडणुकीही ते अशीच साथ देतील, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.