Prithviraj Chavan on PM Modi Govt: केंद्रातील मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपकडून उत्सव साजरा केला जात असताना, दुसरीकडे विरोधक मात्र या ९ वर्षातील कार्यकाळावरून केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका करताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते मोदी सरकारच्या कारभारावर टीका करत आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
मीडियाशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, केंद्रात मोदी सरकार स्थापन होऊन आज नऊ वर्षे पूर्ण झाली. मात्र, या नऊ वर्षांत देशात महागाई, बेरोजगारी वाढली. शेतकऱ्यांना हमीभाव नाही. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. अदानींना फायदा करून देण्यासाठी भ्रष्टाचार केला, करात वाढ करून देशाला लुटले, देशात सुविधा देण्यास मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले, असा घणाघात पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
मोदींनी देश विकायला काढलाय, हे लोकांच्या लक्षात आलेय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू आता संपली आहे. १३५ लाख कोटी कर्ज काढून देशाला कर्जात लोटले. अनेक कंपन्या विकायला काढल्या आहेत. त्यामुळे देशातील अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. पंतप्रधान मोदींनी देश विकायला काढला, हे आता लोकांच्या लक्षात आले आहे. त्याचाच परिणाम म्हणून कर्नाटकमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता आली. अचानक केलेल्या नोटबंदीमुळे देश बेरोजगारी आणि आर्थिक संकटात आला आहे, हे सांगायला आता त्यांना तोंड नाही. त्यामुळे आज नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांना काँग्रेसकडून नऊ प्रश्न विचारले आहेत. त्याची त्यांनी उत्तरे द्यावीत, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
दरम्यान, ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर केला जात आहे. देशातील सामाजिक ऐक्य आणि शांतता धोक्यात आली. लव्ह जिहाद आणि इतर धार्मिक प्रश्न जाणीवपूर्वक उपस्थित करून देशाची दिशा बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच कर्नाटकमध्ये काँग्रेसचा एकहाती विजय झाला आहे. सर्व विभागांत त्यांना जनतेने नाकारले आहे. भाजपने कर्नाटकला धार्मिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला. त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आता देशातील १९ विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकाराने महाविकास आघाडीला ते आता रोखू शकत नाहीत, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.