“...म्हणून आता भाजपाने राम मंदिराचा विषय समोर आणला”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 09:47 AM2024-01-19T09:47:59+5:302024-01-19T09:48:24+5:30

INDIA Alliance: आगामी लोकसभा निवडणूक सोपी नाही हे भाजपाला कळाले आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

congress prithviraj chavan criticizes bjp over ayodhya ram mandir ceremony | “...म्हणून आता भाजपाने राम मंदिराचा विषय समोर आणला”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका

“...म्हणून आता भाजपाने राम मंदिराचा विषय समोर आणला”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका

INDIA Alliance: श्रीराम मंदिराच्या गर्भगृहात रामललाची मूर्ती आसनावर विधिवत पद्धतीने ठेवण्यात आली. अवघ्या काही तासांवर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आला असून, अद्यापही यावरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले. भाजपाला यश मिळत नाही, म्हणून आता राम मंदिराचा विषय आणला आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध मुद्द्यांवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले. कोणत्याही परिस्थितीत भाजपाला निवडणूक जिंकायची आहे. निवडणूक आपल्या हातातून चालली असल्याचे भाजपाला जाणवले आहे, त्यामुळेच ते नेते फोडत आहेत. नेते कुठे गेले तरी कार्यकर्ते आणि मतदार कुठे आहेत हे महत्त्वाचे आहे. ज्या कार्यकर्त्यांनी विचाराला धरून मतदान केले. जातीयवादाविरोधात मतदान केले आहे. नेते त्या पक्षात गेले म्हणून मतदार बदलतील असे नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

...म्हणून आता भाजपाने राम मंदिराचा विषय समोर आणला

भाजपाचा आत्मविश्वास ढळलेला आहे. २०१४, २०१९ ची धोरण मांडले ते फसले. त्यामुळे एकामागोमाग एक पक्ष फोडून, ईडी, सीबीआयचा दबाव वापरून नेते फोडण्याचा प्रयत्न आहे. २०२४ ची निवडणूक ही सोपी नाही हे भाजपाला कळाले आहे. आता प्रभू श्रीराम मंदिराचा विषय भाजपाने समोर आणला आहे. पण, भाजपाला यश मिळत नाही. ईडी आणि आर्थिक आमिषे दाखवून पक्ष फोडण्यात येत आहेत, या शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी हल्लाबोल केला. तसेच जे गेले ती वस्तूस्थिती आहे. काही स्वार्थाकरिता तर काही भीतीपोटी गेलेत. परंतु, मतदार गेलेत की नाही हे निवडणुकीतून स्पष्ट होईल. स्थानिक संस्थांच्या निवडणूक घेण्याचे धाडस भाजपाचे होत नाही. यावरून आपल्याला काय समजायचे ते समजायला हवे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकरांना केले आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्याबाबत अद्याप स्पष्टत नाही. यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, इंडिया आघाडीत २८ पक्ष आहेत. प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत यायचे असेल, तर मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घ्यावी. प्रकाश आंबेडकर कुणाच्या निमंत्रणाची वाट पाहत आहेत, ते माहिती नाही. मल्लिकार्जुन खरगेंना भेटण्यास प्रकाश आंबेडकरांना काय अडचण आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.


 

Web Title: congress prithviraj chavan criticizes bjp over ayodhya ram mandir ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.