Congress Prithviraj Chavan News: सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय नेते राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी करत आहेत. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितली. मात्र, यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पलटवार केला आहे.
गेल्या काही काळापासून या भूमीचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सतत अपमान केला जातो. मात्र, त्यांनी कधी माफी मागितली नाही. उलट ते न्यायालयात जातात, पण त्यांना या गोष्टीचा पश्चात्ताप होत नाही. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गामध्ये जे काही घडले ते दुर्दैवी होते. माझ्यासाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी केवळ राजा, महाराजा, महापुरुष नाहीत, तर छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. म्हणून माझे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची त्यांच्या चरणांवर मस्तक झुकवून माफी मागतो, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. यावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले.
पंतप्रधान मोदींनी सशर्त माफी मागितली, सावरकरांना मधे आणले
पंतप्रधानांनी माफी मागितली असली तरी सशर्त माफी मागितली आहे. त्यांनी मध्येच सावरकरांना आणले. पंतप्रधान आणि भाजपाला महाराजांच्या पुतळ्याचा इव्हेंट करायचा आहे. नुसती माफी मागून चालणार नाही. महाराष्ट्रातील जनतेमध्ये संताप आहे. माफी मागून काही फायदा होणार नाही, जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधानांनी माफी मागून त्यांनी चूक केलेली आहे, हे मान्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या पेशवाईने पुन्हा शिवाजी महाराजांचा अपमान केला. नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच लावली आहे. यांनी सत्तेतून बाहेर व्हावे नाहीतर महाराष्ट्रातील जनता यांना सत्तेतून बाहेर खेचल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी केली.