“मतांचे विभाजन न झाल्यास मोदींचा पराभव निश्चित, प्रकाश आंबेडकरांनी...”: पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 09:48 AM2024-04-05T09:48:04+5:302024-04-05T09:49:03+5:30
Congress Prithviraj Chavan News: मागच्या वेळेस वंचित आणि एमआयएम यांच्या वेगळ्या उमेदवारीमुळे नऊ ठिकाणी भाजपाचे अतिरिक्त खासदार निवडून आले. मत विभाजन करू नये, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
Congress Prithviraj Chavan News: देशातील ६३ टक्के लोकांनी मोदींना पराभूत करण्यासाठी मतदान केले होते. मात्र, ते इतक्या मोठ्या प्रमाणात विभागले गेले की, त्यामुळे मोदींचा पक्ष पुढे गेला. यावेळेस तसे विभाजन होऊ नये, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. मतांचे विभाजन झाले नाही, तर मोदींचा निश्चित पराभव होईल. परंतु, मतांचे जास्तीत जास्त विभाजन कसे होईल, हाच प्रयत्न मोदींचा सुरू आहे, या शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निशाणा साधला.
वंचित बहुजन आघाडी असेल, एमआयएम असेल, अन्य पक्ष असतील. विरोधकांच्या मतांचे विभाजन करून तुकडे करण्याचा प्रयत्न भाजपाचा सुरू आहे. आता काय करावे, याचा निर्णय प्रकाश आंबेडकरांनी घ्यायचा आहे. मागच्या वेळेस वंचित आणि एमआयएम यांच्या वेगळ्या उमेदवारीमुळे नऊ ठिकाणी भाजपाचे अतिरिक्त खासदार निवडून आले. प्रकाश आंबेडकर यांनी मतांचे विभाजन करू नये, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
पक्षाने संधी दिल्यास साताऱ्यातून लढण्यास तयार
अन्य ठिकाणच्या जागा आणि सातारा यामध्ये फरक आहे. सांगली, भिवंडी येथे तीन पक्षांतील तो विषय होता. साताऱ्यातील विषय तीन पक्षांतील नाही. साताऱ्यात काही कन्फ्युजन नाही. सातारा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना गटाकडे आहे. या ठिकाणी सर्वांत सक्षम उमेदवार कोण आहे, याचा निर्णय शरद पवार घेतील. माझ्या उमेदवारीबाबत चर्चा झाली होती. तेव्हा काही गोष्टी मी सांगितल्या. माझ्या पक्षाकडून संधी देण्यात आली तर मी तयार आहे. मात्र, याबाबतचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.