टीईटी घोटाळा उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. हजारो शिक्षकांना कामावरून कमी करण्यात येणार आहे. ज्यांना नोकरी मिळालेली नाही, त्या उमेदवारांना पुन्हा कधीच टीईटी देता येणार नाही. अशातच शिवसेनेचे शिंदे गटातील बंडखोर नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या दोन मुलींची नावे या टीईटी घोटाळ्याच्या यादीत दिसल्याने खळबळ उडाली आहे. यादीतील नावावर अब्दुल सत्तार यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. टीईटीची ती यादी फेक आहे. माझा किंवा माझ्या कुटुंबाचा याच्याशी काही संबंध नाही. जे यात दोषी असतील त्यांना फासावर लटकवा, असे सत्तार म्हणाले आहेत. यावरून आता काँग्रेसने सत्तार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Congress Prithviraj Chavan) यांनी "अब्दुल सत्तारांनाच आता शिक्षणमंत्री करतील" असं म्हणत टीईटी घोटाळ्यावरून खोचक टोला लगावला आहे. "टीईटी घोटाळ्यावर आम्ही विधानसभेत आवाज उठवू. सरकार त्यांचंच आहे. आता अब्दुल सत्तार यांनाच ते शिक्षण मंत्री करतील. मग सगळाच निकाल लागेल. राज्यात अस्थिरता असेल तर अशा गोष्टी बघता येत नाही. घोटाळे बघायला वेळ नसतो. सरकारमध्ये मंत्री कोण होणार? कुणाला कोणते खाते मिळणार? तेच लोक बघतात. त्यामुळे बाकीच्या गोष्टी लपून जातात" असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी निशाणा साधला आहे. कोल्हापुरात कोल्हापुरात पत्रकार परिषदेत त्यांनी असं म्हटलं आहे.
सध्या सोशल मीडियावर एक यादी व्हायरल झाली आहे. यामध्ये हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख अशी दोन नावे आहेत. या नावांवर देखील सत्तार यांनी आक्षेप घेतला आहे. मी अब्दुल सत्तार आहे त्यांच्या नावात पुढे शेख लावले आहे. या नावांतही तफावत असल्याच अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.
"त्या परीक्षेत जर माझ्या मुली पात्र झाल्या असतील तर त्याचे प्रमाणपत्र अद्याप त्यांना मिळालेले नाही. किंवा ते प्रमाणपत्र त्यांनी कुठे दाखवून नोकरी मिळवलेली नाही. त्या २०१५ मध्येच नोकरीला लागलेल्या आहेत. त्यांनी टीईटीच्या प्रमाण पत्राने नोकरी मिळवलेली नाही. माझ्या मुलीचे लग्न झालेले आहे. शिक्षण विभागात चौकशी केल्यास सर्व सत्य बाहेर येईल" असंही सत्तार म्हणाले.