Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेला महाराष्ट्रातूनही मोठा पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले जात आहे. हळूहळू ही यात्रा पुढे जात आहे. अशातच शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवण्याची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना खुद्द राहुल गांधी यांनी शिंदे-भाजप सरकारला आव्हान दिले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. त्यांना भारत जोडो यात्रा रोखायची असेल तर त्यांनी जरूर रोखावी. प्रत्येकाना आपापले मत मांडावे. सरकारला ही यात्रा रोखायची असेल तर त्यांनी तो प्रयत्न करावा, असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले आहे.
काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून कमी पडतोय, हे मत चुकीचे आहे
एकीकडे देशातील सर्व संस्था एकीकडे उभ्या आहेत. विरोधकांचे माध्यमांवर नियंत्रण नाही. मात्र भाजपाचे माध्यमांवर नियंत्रण आहे. वेगवेगळ्या संस्थावरही भाजपाचे नियंत्रण आहे. ते न्यायव्यवस्थेवरही दबाव टाकतात. त्यामुळे काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून कमी पडतोय, हे मत चुकीचे आहे. हा वरवरचा समज आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच या लढाईला अगोदर समजून घ्यावे लागेल. लोकशाहीत एक पत्र दुसऱ्या पक्षाशी लढत असतो. या युद्धात देशातील इतर संस्था पारदर्शकता निर्माण करतात. मात्र आता ही लढाई फक्त दोन पक्षांत नाही, असेही ते म्हणाले.
...म्हणून भारत जोडो यात्रा सुरु करण्याचा निर्णय घेतला
आम्ही माध्यमांसमोर, संसदेत आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. फक्त काँग्रेसच नव्हे तर इतर विरोधी पक्षांनी तो प्रयत्न केला. मात्र आमच्याकडे कोणताही अन्य उपाय शिल्लक न राहिल्यामुळे आम्ही भारत जोडो यात्रा सुरु करण्याचा निर्णय घेतला, असे राहुल गांधी यांनी नमूद केले. मला देशात सध्या दोन मुख्य समस्या दिसत आहेत. पहिली समस्या म्हणजे सध्या युवकांना रोजगार मिळेल याचा विश्वास नाही. युवकांनी कोठेही शिक्षण घेतलेले असले तरी त्यांना रोजगार मिळेलच याची शाश्वती नाही. मला नोकरी मिळेल असे ठामपणे सांगणारा एकही तरुण भेटलेला नाही, अशी बोचरी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
दरम्यान, सध्या देशात अनेक प्रश्न आहेत. जनतेच्या प्रश्नावर आम्हाला संसदेत बोलू दिले नाही. देशात महागाई आहे, रोजगार नाहीत, शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही. जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पैशांचे आमिष देऊन विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सत्ताधारी पक्षाकडून न्याय व्यवस्थेवर दबाब आणला जात आहे, असे अनेक आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"