“नितीश कुमार सर्वांत मोठे पलटुराम, इंडिया आघाडीवर कोणताही परिणाम नाही”; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 02:52 PM2024-01-29T14:52:55+5:302024-01-29T14:55:18+5:30

Congress Criticised Nitish Kumar: राहुल गांधींची लोकप्रियता पाहून भाजपा घाबरले असून, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये सर्वाधिक जागांवर विजय मिळवू, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

congress ramesh chennithala criticised nitish kumar after goes with nda | “नितीश कुमार सर्वांत मोठे पलटुराम, इंडिया आघाडीवर कोणताही परिणाम नाही”; काँग्रेसची टीका

“नितीश कुमार सर्वांत मोठे पलटुराम, इंडिया आघाडीवर कोणताही परिणाम नाही”; काँग्रेसची टीका

Congress Criticised Nitish Kumar: बिहारमध्ये काही दिवसांच्या उलथापालथीनंतर नितीश कुमार यांनी सकाळी राजीनामा दिला आणि सायंकाळी नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी ते भाजपच्या साथीने राज्याच्या नव्या एनडीए सरकारचे मुख्यमंत्री झाले आहेत. यावरून विरोधकांच्या इंडिया आघाडीतील नेते नितीश कुमार आणि भाजपावर टीका करत आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

इंडिया आघाडीच्या चार बैठकांना उपस्थित असणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अचानक भूमिका बदलली, त्यांनी भूमिका बदलल्याचे आश्चर्य नाही. कारण ते आज एक बोलतात व उद्या दुसरेच बोलतात. राजकारणात विश्वास महत्वाचा असतो तो नितीशकुमार यांनी गमावला असून देशातील सर्वात मोठे पलटुराम झाले आहेत. नितीशकुमार यांच्या जाण्याने इंडिया आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. बिहारमध्ये काँग्रेससह राष्ट्रीय जनता दल एकत्र निवडणुका लढवत आहे आणि केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आणू, असा विश्वास प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे.

बिहारमध्ये सर्वात जास्त जागी विजय मिळवू

प्रदेश काँग्रेसची मराठवाडा विभागातील जिल्हानिहाय आढावा बैठक लातूरमध्ये संपन्न झाली. यानंतर मीडियाशी बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल व काँग्रेस पक्षाने मागील निवडणुका एकत्रितपणे लढवल्या होत्या. आताही काँग्रेस व राजद मिळून निवडणुका लढवतील. बिहारमध्ये सर्वात जास्त जागी विजय मिळवू. नितीश कुमार यांची विचारधारा काय आहे व आदर्श काय आहेत, हे जनतेला समजले आहे. जनतेचा इंडिया आघाडीवर विश्वास आहे आणि या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.

राहुल गांधींची वाढती लोकप्रियता पाहून भाजपा घाबरले आहे

खासदार राहुल गांधी देशासाठी जे काम करत आहेत त्यासाठी त्यांचे हात मजबूत करण्याची गरज आहे. भारत तोडो शक्तीच्या विरोधात राहुल गांधींनी भारत जोडोसाठी ४ हजार किमीची पदयात्रा काढली होती. आता मणिपूर ते मुंबई न्याय यात्रा निघाली आहे. राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता पाहून भाजपा घाबरले आहे. म्हणूनच न्याय यात्रेत अडथळे आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. राहुल गांधी या सर्वांचा मुकाबला करत जनतेच्या प्रचंड समर्थनासह आगेकूच करीत आहेत, महाराष्ट्रातही न्याय यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करु, असे चेन्नीथला यांनी सांगितले.

दरम्यान, विभागीय बैठका आयोजित करुन सर्व जिल्ह्यातील पक्ष संघटनेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्रात काँग्रेस एकदिलाने काम करत असून जिल्हा व ब्लॉक स्तरावरही काम सुरु आहे. काँग्रेस हे एक शक्तीशाली संघटन असून ते आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. या आढावा बैठकानंतर १६ व १७ फेब्रुवारीला लोणावळ्यात एक शिबीर होत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी लोकसभेच्या सर्वात जास्त जागा जिंकेल, असा विश्वास आहे.

 

Web Title: congress ramesh chennithala criticised nitish kumar after goes with nda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.