एकजुटीने लढा-विजय मिळवा, निवडणुकीत भाजपा कोणत्याही थराला जाईल; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 06:41 PM2024-02-16T18:41:14+5:302024-02-16T18:42:32+5:30

सर्वांनी एकजुटीने काम केले तर काँग्रेसला विजयापासून कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

congress ramesh chennithala criticize bjp and central govt over various issue | एकजुटीने लढा-विजय मिळवा, निवडणुकीत भाजपा कोणत्याही थराला जाईल; काँग्रेसची टीका

एकजुटीने लढा-विजय मिळवा, निवडणुकीत भाजपा कोणत्याही थराला जाईल; काँग्रेसची टीका

Congress News: महाराष्ट्रातील वातावरण काँग्रेस पक्षासाठी अनुकूल आहे. सर्व राज्याचा दौरा करून आढावा घेतल्यानंतर आता शिबिर घेतले जात आहे. महाविकास आघाडी राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवत आहेत. राज्यातील वातावरण पाहता मविआ सर्वात जास्त जागा जिंकेल. केंद्र सरकारने काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती गोठवली आहेत. निवडणुकीच्या तोंडावर भाजपा कोणत्याही थराला जाईल परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने लढून विजय मिळवावा, असे आवाहन रमेश चेन्नीथल्ला यांनी केले.

लोणावळ्यात आयोजित केलेल्या काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिरात ते बोलत होते. याचवेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मार्गदर्शन केले. लोकसभा निवडणुकीची परिस्थिती आपल्यासाठी ‘करा किंवा मरा’ अशी आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा लागणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस व मविआला चांगले वातावरण आहे परंतु त्यासाठी लोकांच्या घरापर्यंत जावे लागणार आहे. मतदार याद्या अद्ययावत कराव्या लागणार आहेत. बुथ लेवलपर्यंत काम करा, बीएलएचे काम निवडणुकीत सर्वात महत्वाचे आहे, त्यांच्या नियुक्त्या करा. भारतीय जनता पक्षाच्या तोडफोडीच्या व जाती धर्मात भांडणे लावणाऱ्या प्रवृत्तीला लोक कंटाळले आहेत. सर्वांनी एकजुटीने काम केले तर काँग्रेसला विजयापासून कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

नरेंद्र मोदी खोट्यांचे सरदार, २०१४ साली दिलेल्या गॅरंटीचे काय झाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच मोदींची गॅरंटी, मोदींची गॅरंटी असे बोलत असतात, त्यांच्या बोलण्यात मी, मी पणा जास्त असतो. आपण ‘आम्ही भारताचे लोक’ असे म्हणतो. परंतु मोदी मात्र मी, मी असेच करतात. नरेंद्र मोदी सातत्याने खोटे बोलत असतात, ते खोट्यांचे सरदार आहेत. मोदींनी आजपर्यंत दिलेली एकही गॅरंटी पूर्ण केली नाही. २०१४ मध्ये मोदींनी काळा पैसा आणून प्रत्येकाला १५ लाख रुपये प्रत्येकाला देण्याची, दरवर्षी २ कोटी नोकरी देण्याची, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करू, या गॅरंटी दिल्या होत्या या मोदी गॅरंटीचे काय झाले? असा सवाल काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केला आहे.

दरम्यान, या शिबिराला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते.


 

Web Title: congress ramesh chennithala criticize bjp and central govt over various issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.