Congress On President Droupadi Murmu : कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणावररुन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी संताप व्यक्त केला. या घटनेनंतर पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या गोंधळावरूनही राष्ट्रपती मुर्मू यांनी भाष्य केलं होतं. समाजाला प्रामाणिकपणे आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटलं होतं. राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसने पलवटवार केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी महाराष्ट्रातील महिला अत्याचारही बोलायलं हवं असं परखड मत काँग्रेसने मांडलं आहे.
कोलकाता येथील आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. देशभरात या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर संघटना आणि नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे, देशाच्या राष्ट्रपती द्रौपद्री मूर्मू यांनी याप्रकरणी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रपती मुर्मूंनी दिलेल्या निवेदनावरुन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी भाष्य केलं आहे. ते नागपुरात बोलत होते.
"केवळ कोलकाता नाही, तर राष्ट्रपतींनीही महाराष्ट्रातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली पाहिजे. बदलापूर येथे जे घडले त्यामुळे महाराष्ट्रातील जनता व्यथित झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराचीही दखल घ्यायला हवी. त्या संपूर्ण राष्ट्राच्या राष्ट्रपती आहेत," असं रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू?
"कोलकाता येथील घटना वेदनादायक आणि भयावह आहे. बस आता खूप झालं. ज्यावेळी कोलकाता येथे विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिक आंदोलन करत होते, तेव्हा या प्रकरणातील आरोपी खुलेआम फिरत होते. कोणताही सुसंस्कृत समाज मुलींवर अशाप्रकारे अत्याचार होऊ देऊ शकत नाही. समाजाला आता प्रामाणिकपणे आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. नागरिकांनी स्वत:ला कठीण प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. समाजाची दयनीय मानसिकता महिलांना कमी लेखते. १२ वर्षांपूर्वी झालेल्या निर्भया प्रकरणानंतर अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत. मात्र, समाजाने याकडे दुर्लक्ष केलं. आपल्या समाजाला सामूहिक स्मृतिभ्रंशाचा त्रास झाल्याचे दिसून येते, या संकटाचा आपण सर्वांनी मिळून सामना केला पाहिजे," असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.