“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 05:29 PM2024-09-23T17:29:27+5:302024-09-23T17:35:48+5:30

Congress Ramesh Chennithala: मविआच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा निर्धार काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला. तसेच भाजपाच्या भ्रष्ट सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

congress ramesh chennithala criticized that bjp mahayuti govt failed to solve people problems | “जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला

“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला

Congress Ramesh Chennithala: भाजपाचे सरकार शेतकरी विरोधी असून, सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा, धान उत्पादक शेतकरी अनेक समस्यांचा सामना करत आहे. शेतमालाला भाव मिळत नाही. निर्यात करु शकत नाही आणि सरकार काहीच पावले उचलत नाही. समस्यांच्या गर्तेत सापडलेला शेतकरी आत्महत्या करत आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होत आहेत. महागाई व बेरोजगारीने जनता त्रस्त आहे पण भाजपा सरकारला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. टेंडर काढणे, भ्रष्टाचार आणि पैसा वसुली एवढेच सरकारचे काम सुरु आहे, या शब्दांत प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी हल्लाबोल सरकारवर केला.

प्रदेश काँग्रेसची विभागीय आढावा बैठक झाली. यावेळी काँग्रेसचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहे. महाराष्ट्राची अस्मिता गुजरातकडे गहाण ठेवली असून २९ प्रकल्प गुजरातला पळवले आहेत. प्रकल्प गेला नाही असे देवेंद्र फडणवीस छाती फोडून सांगत असले तरी १८ हजार कोटी रुपयांचा सोलर पॅनलचा प्रकल्प गुजरातला पळवला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात गुंतवणूक होणारे ३ लाख २८ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचे काम केले आणि गुजरातचे ड्रग महाराष्ट्र आणून तरूणांना बरबाद केले आहे. ५ लाख कोटी रुपयांच्या जमिनी गुजराती उद्योगपतींच्या खिशात घातल्या आहेत, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. 

पंतप्रधान मोदींनी टीका केली, पण लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात जोरात चालवली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील त्यांच्या भाषणातून लाडकी बहीण योजनेवर टीका केली आणि महाराष्ट्रात मात्र तीच योजना मोठ्या जोशात सुरु आहे. महाराष्ट्रात एक बोलायचे व झारखंडमध्ये दुसरे बोलायचे हा दुटप्पीपणा आहे. भारतीय जनता पक्ष दुतोंडी साप असल्याचे यातून उघड झाले आहे, या शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला. आढावा बैठकीवेळी विदर्भातून मविआच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला तसेच भाजपाच्या भ्रष्ट सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

दरम्यान, राज्याच्या ७६ टक्के भागात दुष्काळ आहे. अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे, पण भाजपा सरकारने तेलंगणाला ४ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले परंतु महाराष्ट्राला मात्र फुटकी कवडीही दिली नाही. केंद्र व राज्यातील भाजपा सरकार जाणिवपूर्वक शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. भाजपा युती सरकार सर्व आघाड्यांवर फेल आहे पण भ्रष्टाचारात मात्र अग्रेसर आहे, अशी टीका प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली. 
 

Web Title: congress ramesh chennithala criticized that bjp mahayuti govt failed to solve people problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.