Congress Ramesh Chennithala News: महाराष्ट्रात काँग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष आहे. विधानसभा निवडणुका मविआ एक होऊन लढणार आहे. कोकण विभागात काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करून या भागात काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी काम करा. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येईल व नरेंद्र मोदी सरकार हटवण्याची सुरवात महाराष्ट्रातून होईल, असा विश्वास रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाची एक आढावा बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील आदींसह काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना रमेश चेन्नीथला यांनी भाजपा महायुतीसह केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
राहुल गांधी अशा धमक्यांना घाबरत नाहीत
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सत्ताधारी पक्षाचा खासदार, एक आमदार व एका केंद्रीय मंत्र्यांने दिलेल्या धमक्या धमक्या गंभीरपणे घेतल्या पाहिजेत. राहुल गांधी यांचा देश-विदेशात नावलौकिक व विश्वासार्हता प्रचंड वाढली आहे. नरेंद्र मोदी व आरएसएस विरोधात लढणारे देशातील ते एकमेव नेते असून राहुल गांधी भाजपासमोर मोठे आव्हान बनले आहेत. त्यामुळेच घाबरलेला भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्र पक्षाचे नेते त्यांना सातत्याने धमक्या देत आहेत, पण राहुल गांधी अशा धमक्यांना घाबरत नाहीत, असे चेन्नीथला यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर वातावरण बदलले आहे. भाजपा सरकारच्या काळात लोकांचे जगणे कठीण झाले आहे. जनता त्रस्त आहे. जनतेला आता बदल हवा आहे. राज्यात सध्या काँग्रेसमय वातावरण आहे. त्यामुळे आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाचा विचार घेऊन तळागाळापर्यंत जाऊन काँग्रेसचा विचार लोकापर्यंत पोहोचवा व राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणा, असे विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील म्हणाले.