Congress Ravindra Dhangekar News: पुणे लोकसभेत आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपाकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना आधीच उमेदवारी जाहीर झाली आहे. यातच उमदेवारीसाठी वणवण करणाऱ्या वसंत मोरे यांना अखेर यश आले आहे. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी मिळाली आहे. यावर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी थेट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
मीडियाशी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, मी पुणेकरांचा उमेदवार आहे. गेले कित्येक वर्ष पुणेकरांनी मला आशीर्वाद दिला आहे. माझ्या पुण्यासाठी मतदान मागणार आहे. लोकशाहीत अधिकार आहे, सर्वांना संधी मिळते. कोणी कुठूनही उभे राहावे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता इंडिया आघाडीला पुणेकर मतदान करताना पाहायला मिळतील. लोकशाहीसाठी जनता इंडिया आघाडीच्या मागे उभे राहील, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.
ही निवडणूक पुणेकर लढणार आणि पुणेकरच जिंकणार
लोकशाहीमध्ये कोणीही कुठूनही निवडणूक लढू शकतो, तो ज्याचा त्याचा संविधानिक अधिकार आहे. जो उमेदवार लोकशाहीसाठी लढेल, लोक त्यालाच मतदान करतील. वसंत मोरे अनेक पक्षातील नेत्यांना आणि लोकांना भेटले . ते कोणत्याही पक्षात गेले तरी ते निवडणूक लढवणारच होते. डोके शांत ठेवावे, असे सल्ला रवींद्र धंगेकरांनी दिला आहे. तसेच ही निवडणूक चांगल्या पद्धतीने लढवावी, असेही ते म्हणाले.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्यावर वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली. मी सुरुवातीपासूनच सांगत होतो की, काही झाले तरी लोकसभा निवडणूक लढवणारच. वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली हे माझे भाग्य समजतो. मात्र, २५ वर्षे ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही. परंतु, प्रकाश आंबेडकर यांनी मला न्याय दिला. मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवेन, असे वसंत मोरे म्हणाले.