नवी दिल्ली : लोकसभेतील महाराष्ट्र काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर वंचित बहुजन आघाडीसोबत विधानसभेसाठी चर्चा करण्याची तयारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केली आहे. राष्ट्रवादीसोबत आघाडीचे निश्चित झाले असून वंचितसोबत चर्चा करण्याची तयारी असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.
आज नवी दिल्लीमध्ये महाराष्ट्र काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. विधानसभेतील रणनितीवर यामध्ये चर्चा करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीला झालेल्या मतविभाजनामुळे काँग्रेसच्या लोकसभेच्या 9 जागा पडल्याचेही चर्चेत आले. यामुळे वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करणे आणि त्यांच्याशी आघाडी करण्याची जबाबदारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. तसेच वंचित आघाडीच्या नेत्यांसोबत येत्या 6 जुलै रोजी बैठक घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
लोकसभेच्या दारूण पराभवामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व्यथीत झाले आहेत. त्यांनी राजीनामा दिल्यानंतरही एकाही काँग्रेसच्या नेत्याने जबाबदारी न स्वीकारल्याने ते नाराज झाले होते. ही खंत व्यक्त केल्यानंतर देशभरातील कांग्रेस नेत्यांनी त्यांच्या पदांचे राजीनामे पाठविले आहेत. यामध्ये अशोक चव्हाण यांचेही नाव आहे.