मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीविरुद्ध भाजपा अशी लढाई पाहायला मिळू शकते. परंतु तत्पूर्वी राजकीय घडामोडींमुळे मविआत तणावाची स्थिती आहे. त्यात काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच जागा लढण्याची तयारी केली आहे. त्यात बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.
काँग्रेसने प्रत्येक नेत्याला २ मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. त्यात शिरूर, बारामतीची जबाबदारी असलेले कुणाल पाटील यांनी सांगितले की, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीत शिरूर, बारामती लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेण्यात आली. भाजपा सरकारविषयी सर्वसामान्यांमध्ये जी नाराजी आहे ती कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जाणवली. अनेक मुद्दे घेऊन भाजपाने लोकांना खोटी आश्वासने दिली, वचने दिली ती आता उघडी पडू लागलेत. ९ वर्षानंतरही त्याची पूर्तता नाही असं त्यांनी म्हटलं.
तसेच लोकं पुन्हा एकदा काँग्रेसला जनतेने स्वीकारले आहे. शिरूर, बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांनी इच्छा आहे. लोकं काँग्रेसच्या पाठीशी आहेत. या दोन्ही मतदारसंघाचा आढावा घेतला असून या रिपोर्ट लवकरच आम्ही वरिष्ठांकडे सोपावू असंही कुणाल पाटील यांनी सांगितले.
माढा लोकसभा मतदारसंघावरही काँग्रेसचा दावा
महाराष्ट्रातून महायुतीच्या नेतृत्त्वात ४५ जागा निवडून आणण्याचं भाजपाचं लक्ष्य आहे. तर, काँग्रेससह महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेस निरीक्षक आणि वरिष्ठ नेते यासाठी दौरे करत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. त्यावेळी, येथील पुढील खासदार काँग्रेसचाच असेल असा दावाही त्यांनी केला आहे.
भाजप खासदार निवडून आपण नुकसान करून घेतल्याची जाणीव इथल्या मतदारांना झाली आहे. तर, मोदी सरकारमुळे देश आर्थिक संकटाकडे वाटचाल करतोय. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी राज्य सरकार बदल्यांमध्ये भ्रष्टाचार करत आहे. एकनाथ शिंदे हे फक्त नावापुरतेच मुख्यमंत्री आहेत, असा टोलाही पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. दरम्यान, या मतदारसंघात स्वतंत्रपणे निवडणूक लढल्यास खासदार काँग्रेसचाच होईल, असे काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी म्हटले.